एका संशयिताचे रेखाचित्र जारी
By Admin | Published: September 13, 2015 09:15 PM2015-09-13T21:15:08+5:302015-09-13T22:17:41+5:30
सामूहिक अत्याचार प्रकरण : ठोस धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती नाहीत
सातारा : सातारा-कोरेगाव रस्त्यावरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सुरक्षारक्षकाच्या झोपडीवर शुक्रवारी पडलेला दरोडा आणि पतीदेखत पत्नीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील एका संशयिताचे रेखाचित्र पोलिसांनी रविवारी जारी केले. दरम्यान, या प्रकरणी ठोस धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.बांधकामावर निगराणी करण्यासाठी नेमलेल्या दाम्पत्यातील पत्नीवर तीन दरोडेखोरांनी पतीच्या डोळ्यांदेखत सामूहिक अत्याचार केला होता. वीस ते पंचवीस वयोगटातील दहा ते बारा दरोडेखोर दाम्पत्याच्या झोपडीत शुक्रवारी पहाटे घुसले होते. खिडकीच्या काचा फोडून ‘घरात असेल ते द्या, अन्यथा तुम्हाला सोडणार नाही,’ असे म्हणत हाताला लागेल ते लुटून नेले. तसेच पतीला जिवे मारण्याची धमकी देऊन दरोडेखोरांनी पत्नीवर सामूहिक अत्याचार केला. शुक्रवारी सकाळी ही माहिती पोलिसांना समजल्यावर त्यांनी नाकेबंदी केली; मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही.दरम्यान, पीडित महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एका दरोडेखोराचे रेखाचित्र तयार करवून घेतले आहे. या इसमाने तोंडावरील मास्क काही वेळासाठी काढला होता. त्यामुळे अंधार असूनही त्याचा चेहरा पीडितेला थोड्या वेळासाठी दिसला होता. त्या वर्णनावरून हे रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून दरोडेखोरांचा कसून शोध घेतला जात असून, पोलिसांची सात पथके शोधासाठी ठिकठिकाणी रवाना झाली आहेत.
दरम्यान, तपासासाठी उपयोगी पडणारा तांत्रिक ‘डाटा’ रविवारी पोलिसांना उपलब्ध होऊ शकला नाही. तो उपलब्ध झाल्यावर तपासाला आणखी गती मिळेल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कुठे गेले मानवाधिकारवाले? -दरोडा आणि सामूहिक अत्याचाराचे प्रकरण शहरापासून इतक्या जवळ घडूनही दोन दिवस कोणत्याही स्वयंसेवी संस्थेला पीडित महिलेची अद्याप दखल घ्यावीशी वाटलेली नाही. पीडित कुटुंबाला ना मानवाधिकारवाल्यांनी भेट दिली, ना महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी. एरवी छोट्या-मोठ्या प्रसंगांमध्ये ‘धावून येणारे’ संबंधित पीडितेला भेटलेही नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सीसीटीव्हीची कमतरता
संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडे ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज हा एक महत्त्वाचा धागा आहे. घटनेच्या दिवशी पाऊस असल्याने तसेच रात्रीच्या वेळी वाहनांचे प्रखर दिवे आणि अन्य कारणांमुळे अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्पष्ट धागा अद्याप सापडलेला नाही. दरम्यान, शहराच्या प्रवेशद्वारांवर उच्च क्षमतेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता या तपासात पोलिसांना जाणवत आहे. खिंडवाडी, लिंबखिंड, मोळाचा ओढा, बाँबे रेस्टॉरंट चौक, वाढे फाटा, बोगदा अशा ठिकाणी कॅमेरे बसविण्याची गरज व्यक्त होत आहे.