अनेक पिढ्यांनी पाहिलेले रस्त्याचे स्वप्न सत्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:37 AM2021-05-16T04:37:37+5:302021-05-16T04:37:37+5:30
चाफळ : अनेक पिढ्या डोंगर खाली-वर करून संपल्या. रस्ता आज होईल, उद्या होईल या आशेवर जगणाऱ्या कोळेकरवाडीकरांच्या रस्त्याचे स्वप्न ...
चाफळ : अनेक पिढ्या डोंगर खाली-वर करून संपल्या. रस्ता आज होईल, उद्या होईल या आशेवर जगणाऱ्या कोळेकरवाडीकरांच्या रस्त्याचे स्वप्न अखेर सत्यात उतरू पाहत आहे. कोळेकरवाडी गावापर्यंत कडेकपारी फोडून रस्ता गावापर्यंत पोहोचवण्यासाठी तीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे कोळेकरवाडीतील ग्रामस्थांतून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
कोळेकरवाडी हे गाव डेरवण ग्रामपंचायती अंतर्गत येते. चाफळ विभागातील डोंगरी व दुर्गम विभागात वसलेले हे एक छोटेसे गाव आहे. स्वातंत्र्यानंतर येथील ग्रामस्थ रस्त्याच्या शोधात होते. अत्यावश्यक काम असो की गुरुवारचा चाफळला भरणारा आठवडा बाजार. चालत डोंगरातून वाट शोधत तीन ते चार किलोमीटर पायपीट करावी लागते. डोक्यावर बाजार घेऊन तेवढंच अंतर पुन्हा डोंगर चढून जायचे हा येथील ग्रामस्थांचा नित्यनेमाने एक सवयीचा भागच झालेला. कधी आपल्या गावाला रस्ता होईल, ही आशाही धूसर बनली होती. येथील एक पिढी वार्धक्याकडे तर एक पिढी रस्त्याची आस घेऊन जीवन जगत होती. निवडणुका आल्या की, फक्त आश्वासन मिळण्यापलीकडे काहीच मिळालं नाही. आपल्या गावाचा रस्त्याचा प्रश्न नक्कीच कोणीतरी सोडवेल, या अपेक्षेने गावातील संभाजी कोळेकर, हणमंत कोळेकर, नारायण डिगे यांच्यासह गावातील तरुण व ग्रामस्थांनी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला होता. पण रस्त्याच्या दुतर्फा वनविभाग असल्याने रस्त्याच्या कामासाठी मोठी अडचण निर्माण झाली. पण, अडचणीपुढे हार मानणारे कोळेकरवाडीचे ग्रामस्थ नव्हते. रस्ता मंजूर होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वन विभागातून जाणाऱ्या रस्त्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी कागदपत्रांचा पाठपुरावा सुरू केला. अनेक अडचणी आल्या तरी त्यावर मात करत प्रयत्न सुरू केलेे. अखेर वनविभागाकडून परवानगी मिळाली. लागलीच मंत्री देसाई यांनी कोळेकरवाडी रस्त्याच्या कामासाठी मूलभूत सुविधा पुरविणे (२५१५-१२३८) अंतर्गत ३० लाख रुपयांचा पहिला निधी मंजूर केला. नुकताच या रस्त्याचा सर्व्हे करण्यात आला.
यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भरत साळुंखे, शिवदौलतचे संचालक चंद्रकांत पाटील, इरफान मुल्ला व बांधकाम विभागाचे ए. एम. जाधव उपस्थित होते.
चौकट
कोळेकरवाडी रस्त्याचे काम खूप अडचणीचे होते. पहिल्यापासून गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी कोळेकरवाडी रस्ता पूर्ण करणारच, असे ठामपणे सांगितले होते. ३० लाखांचा निधी मंजूर झाल्याने सर्व ग्रामस्थ आनंदी आहेत, अशी माहिती संभाजी कोळेकर यांनी दिली.