प्यायला मुबलक पाणी, पिकं मात्र तहानलेलीच!
By admin | Published: December 26, 2015 11:53 PM2015-12-26T23:53:38+5:302015-12-27T00:09:44+5:30
शिरगाव दलित वस्ती : केंजळ जलसिंचन उपसा योजनेतून पाणी देण्याची मागणी
राहुल तांबोळी, भुर्इंज :वाई तालुक्यातील शिरगाव हे तसं सधन गाव. अंगणावरून घराची परीक्षा जसे केली जाते, तसेच या गावात प्रवेश करताना तेथील रस्त्यांवरूनच गावातील सुविधा चांगल्या असल्याचे अनुभवायला मिळाले. या गावातील दलित वस्तीतही बहुतांश सुविधा पोहोचल्या आहेत. मात्र वस्तीला लागूनच असणाऱ्या त्यांच्या शेतीला मात्र पाणी नसल्याने दलितांच्या शेतीची पाण्यावाचून परवड सुरू आहे.
येथील दलितवस्तीत रस्ते डांबरीकरण, नाले, पथदिवे, पिण्याचे मुबलक पाणी या सुविधा पोहोचल्या आहेत. याबद्दल येथील ग्रामस्थांची कसलीही तक्रार नाही. मात्र डोळ्यासमोर असणाऱ्या शेतीला पाणी नसल्याने त्यांचे डोळे पाण्याने डबडबत आहेत. या वस्तीतील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी वस्तीलगतच आहेत. मात्र ही सारी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यंदा तर पावसाने हुलकावणी दिल्याने दुबार पेरणी करावी लागली.
दुबार पेरणी केली असली तरी फारसे उत्पन्न हाती लागणार नाही, अशी परिस्थिती आहे. या वस्तीतील रहिवाशांच्या शेतीसाठी पाणी मिळावे, यासाठी विशेष योजना राबवावी, अशी मागणी येथील रहिवाशांमधून होत आहे. शेतीला पाणी मिळालं तर खऱ्या अर्थानं या वस्तीतील जीवन सुखकर होईल, अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली.