सत्तर गावांतील ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याची समस्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:37 AM2021-05-24T04:37:25+5:302021-05-24T04:37:25+5:30
वडूज : खटाव तालुक्यातील पूर्व भागातील सत्तर गावातील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला असताना व कुठलीही संमती न घेता मायणी पक्षी ...
वडूज : खटाव तालुक्यातील पूर्व भागातील सत्तर गावातील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला असताना व कुठलीही संमती न घेता मायणी पक्षी संवर्धन राखीव समूह क्रमांक दोन येरळवाडी तलाव अधीसूचना पारित केली. येरळवाडी तलाव वनविभागाच्या ताब्यात गेल्यास भविष्यात सत्तर गावांतील लाखो ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार आहे. त्यामुळे आवश्यक तो बदल करावा अन्यथा याच तलाव्यात जलसमाधी घेण्याचा इशारा विविध गावांतील ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी येरळवाडीचे माजी चेअरमन बाळासाहेब पोळ, माजी सभापती नाना पुजारी, हणमंत देशमुख, विजय इनामदार, विजय बागल, दत्ता पाटोळे, विजय निकम, सरपंच योगेश जाधव, रामभाऊ पाटील यांची उपस्थिती होती.
आंदोलनकर्त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या येरळवाडी तलावावर दीड लाख लोक व ऐंशी हजार जनावरे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. तर तीनशेहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा होत असतो. वडूजसह सहा गावे, औंधसह २१ गावे, खातवळसह १२ गावे, मायणीसह सहा गावांची नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. सुमारे तालुक्यातील सत्तर टक्के गावांची तहान हा येरळा तलाव भागवत असतो. दुष्काळी परिस्थितीत याच तलाव्यावर अवलंबून असलेला टँकर फिडर पाॅइंटही आहे. येरळवाडी परिसरातील पंधरा ते वीस गावांना शेतीसाठी उजवा व डावा कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या तलाव्याची निर्मिती १९७२ घ्या दुष्काळात केलेली होती; परंतु १५ मार्चच्या अधिसूचनेमध्ये समूह क्रमांक दोन येरळवाडी तलावमधील अंबवडे, नढवळ, येरळवाडी व बनपुरी या गावांच्या हद्दीतील तलाव खालील द्वितीय समूह बुडीत क्षेत्र ६३३, ५७ हेक्टर आर हे मायणी पक्षी संवर्धनासाठी राखीव केले आहे. ३१ ऑगस्ट २०२० रोजी अंबवडे, येरळवाडी, बनपुरी व नढवळ या गावांतील बाधित शेतकऱ्यांनी येरळवाडी तलावातील बुडीत क्षेत्र पाटबंधारे विभागाने वनविभागात हस्तांतरित न करण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार साताऱ्यातील सिंचन मंडळ पाटबंधारे जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता यांनी वनविभागास कुठलीही सहमती अनुमती दिलेली नाही.
वनविभागाचे येरळवाडी धरणातील बाधित शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे विरोध दर्शविला होता. त्यानंतरही वनविभागाने पाटबंधारे जलसंपदा विभाग, अंबवडे, येरळवाडी, नडवळ व बनपुरी या गावांतील ग्रामपंचायती बाधित शेतकरी पाणीपुरवठा व उपसा सिंचन योजना वडूज नगर पंचायत नळ पाणीपुरवठा योजना या सर्वांचा विरोध असताना व संमती न घेता, मायणी पक्षी संवर्धन राखीव समूह क्रमांक दोन येरळवाडी तलाव आधी सूचना पारित केली आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार अ असाधारण क्रमांक ४० मध्ये बदल करून मायणी पक्षी संवर्धन राखीव समूह क्रमांक २ येरळवाडी तलाव एकूण क्षेत्र ६३३,५७ हेक्टर आर हे क्षेत्र वगळून सर्व बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा व तशी नवीन अधिसूचना जारी करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन पालकमंत्री बाळासाहेब पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना देण्यात आलेले आहे.
चौकट
पाणीपुरवठा योजनांचाही विरोध
येरळवाडी धरणातून पाणीपुरवठा होत असलेल्या सर्व ग्रामपंचायती, नगर पंचायत सहकारी पाणीपुरवठा संस्था, कातरखटाव पाणीपुरवठा संस्था, साखर कारखाने व खासगी संस्था यांनी येरळवाडी धरणाचा समावेश मायणी पक्षी संवर्धन राखीव समूह दोनमधून येरळवाडी धरण वगळण्यात यावे, अशी लेखी मागणी केली आहे.