सुप्रियाच्या धाडसामुळे वाहनचालक ताब्यात -: शिवापूर टोलनाक्यावर पोलिसांनी गाठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:10 AM2019-07-27T00:10:38+5:302019-07-27T00:12:27+5:30
सातारा : सातारा-पुणे खासगी गाडीने प्रवास करणाऱ्या सुप्रिया भोसले हिने दाखवलेल्या धाडसामुळे अपघात करून पळून जाणाºया वाहनचालकाला ताब्यात घेण्यात ...
सातारा : सातारा-पुणे खासगी गाडीने प्रवास करणाऱ्या सुप्रिया भोसले हिने दाखवलेल्या धाडसामुळे अपघात करून पळून जाणाºया वाहनचालकाला ताब्यात घेण्यात यश आले आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत शिरवळ परिसरात चर्चा सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी, येथील सुप्रिया भोसले या एका खासगी गाडीने पुण्याकडे प्रवास करत होत्या. गाडी शिरवळपासून पुढे नीरा नदीच्या पुलावर पोहोचल्यानंतर त्या प्रवास करत असलेल्या गाडीनेच समोरून जाणाºया दुचाकीस्वरांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की गाडीवरील दाम्पत्य रस्त्याच्या कडेला पडले. त्यांच्यासोबत तीन-चार वर्षांचे बाळ असल्याचेही सुप्रियाने पाहिले.
‘आपल्या गाडीने त्यांना उडवलंय. तुम्ही गाडी बाजूला घ्या, त्यांना आपल्या मदतीची गरज आहे,’ असं वारंवार सांगूनही ड्रायव्हरने याकडे दुर्लक्ष करत गाडी गडबडीने पुढे नेली. या गाडीचे पासिंग झाले नसल्यामुळे त्यावर नंबर नव्हता. या संधीचा फायदा घेऊन ड्रायव्हर गाडी पुढे नेत असल्याचा अंदाज आल्यानंतर सुप्रियाने भाऊ जीवन जाधव यांच्याशी संपर्क साधून या प्रसंगाविषयी माहिती दिली. जीवन यांनी तिला पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचा नंबर देऊन संपर्क साधण्याचं सांगितलं.
पोलीस निरीक्षक घनवट यांच्याशी संपर्क होईपर्यंत गाडीने टोलनाका गाठला नव्हता. घनवट यांना पूर्ण माहिती दिल्यानंतर टोलनाक्यावरच गाडी अडविण्याची तयारी केली. त्यानंतर महामार्ग पोलीस आणि टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही गाडी बाजूला घेऊन वाहनचालकाला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिसांत तक्रार दाखल झाली नव्हती.
दोघा जखमींवर शिरवळमध्ये उपचार सुरू
या अपघातात जखमी झालेल्या दाम्पत्यावर शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात जखमी झालेल्या महिलेच्या हातापायाला मार लागला आहे. तर तिच्या पतीला किरकोळ जखम झाली आहे. त्यांच्यासोबत असणाºया त्यांच्या लहान बाळालाही किरकोळ दुखापत झाली आहे. सुप्रिया भोसले हिच्या प्रसंगावधानामुळे अपघात घडविणाºया वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
गाडीत पहिल्याच सीटवर बसल्याने मला समोर घडलेला हा अपघात पाहता आला. गाडी थांबवून अपघातग्रस्तांना मदत करण्याचं ड्रायव्हरला सांगितलं तर त्याने याकडे दुर्लक्ष केलं. छोटं लेकरू सोबत घेऊन प्रवास करणाºया या जोडप्याला चांगलाच मार लागलाय.
- सुप्रिया भोसले, प्रवासी, सातारा
मी ज्या गाडीतून प्रवास करतेय ती गाडी दुचाकीला धडक देऊन तशीच पुढं आली आहे, असा फोन अनोळखी नंबरवरून आला. याविषयी तातडीने महामार्ग पोलीस आणि टोल प्रशासनाशी संपर्क साधून ती गाडी खेड शिवापूर टोलनाक्यावर अडवली.
- पद्माकर घनवट,
पोलीस निरीक्षक, पुणे ग्रामीण