वाहनचालकांचा स्टंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:35+5:302021-06-30T04:25:35+5:30
सातारा : शहरातील राजपथावर रात्रीच्या सुमारास युवकांकडून दुचाकीवर बसून स्टंटबाजी सुरू असते. अशा हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून ...
सातारा : शहरातील राजपथावर रात्रीच्या सुमारास युवकांकडून दुचाकीवर बसून स्टंटबाजी सुरू असते. अशा हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. राजपथावर रात्री काही युवक दुचाक्या बेफामपणे चालवत येत असतात.
बेशिस्त वाहनतळ
सातारा : जिल्हा परिषदेच्या पार्किंगमध्ये दुचाकी अस्ताव्यस्त लावण्यात येत आहेत. त्यामुळे गाड्या काढताना व उभ्या करताना अडचणी निर्माण होत आहेत. या प्रकरणी संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे. या ठिकाणी नोकरदार दुचाक्या लावतात. तसेच कामानिमित्त येणाऱ्यांच्या गाड्या असतात, पण अनेक वेळा पार्किंगमध्ये जागा उरत नाही.
रस्ते खड्डेमय
सातारा : कोरेगावकडे जाण्याच्या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. संबंधितांनी रस्त्याची दुरवस्था थांबवावी, अशी मागणी होत आहे. कृष्णानगर येथील कालव्यापासून कृष्णा नदीच्या पुढील काही अंतरापर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.
चौकामध्ये अस्वच्छता
सातारा : सातारा शहरातील अनेक स्वच्छतागृहांशेजारी कचरा, घाण टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. संबंधितांनी या ठिकाणची स्वच्छता वारंवार करावी, अशी मागणी होत आहे. काही नागरिक कचरा, घाण आणून टाकतात, तर भटकी कुत्री कचरा विखरून टाकत असतात.
दिवसाही पथदिवे सुरू
सातारा : साताऱ्यातील पोवई नाका ते जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील पथदिवे शुक्रवारी सकाळीही सुरू होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन्ही बाजूंचे दिवे सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. याबाबत काही जणांनी संबंधित विभागाला मोबाइलवरून माहिती देण्याचाही प्रयत्न केला.
शाळा बंद असल्याने मुलेही कंटाळली
सातारा : कोरोनानंतर मार्चपासून जिल्ह्यातील सर्वच शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा बंद असल्याने मुले घरात असून, त्यांना मैदानावरही जाता येत नव्हते. आता मैदाने सुरू केली आहेत. मात्र सवंगड्यांची भेट होत नसल्याने मुले कंटाळली आहेत. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पावसामुळे घसरगुंडी
सातारा : साताऱ्यातील अनेक भागांत रस्त्याचे काम झाले आहे. त्यामुळे वाहने सुसाट धावत असतात. मात्र पावसामुळे रेती वाहून आली आहे. त्यामुळे दुचाकी वाहने वळणावर घसरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
पिशव्यांसाठी पोते
सातारा : कापड दुकानांतील वस्तू प्लास्टिकच्या पोत्यात बांधून येत असतात. या पोत्यापासून आता अनेक व्यापाऱ्यांनी पिशव्या बनवून घेतल्या आहेत. या पिशव्यांमधूनच ग्राहकांना वस्तू दिल्या जातात. त्यामुळे आजवर टाकून दिल्या जात असलेल्या वस्तूंचा वापर चांगल्या कामासाठी होऊ लागल्याने कौतुक होत आहे.
सैदापूर रस्त्यावर धोका
सातारा : सातारा-सैदापूर रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या कामासाठी आणून ठेवलेली माती, रेती, दगड गोटे रस्त्याच्या कडेलाच पडलेले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये अपघातांचा धोका व्यक्त केला जात आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.