माण, खटावसह सातारा जिल्ह्यात दुष्काळी ‘ढग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:39 PM2018-10-14T22:39:05+5:302018-10-14T22:39:27+5:30
नितीन काळेल । सातारा : जिल्ह्यात वेळेत हजेरी लावलेल्या पावसाने पश्चिम भाग वगळता पूर्वेकडे कायमच उघडीप दिली. त्यामुळे पूर्व ...
नितीन काळेल ।
सातारा : जिल्ह्यात वेळेत हजेरी लावलेल्या पावसाने पश्चिम भाग वगळता पूर्वेकडे कायमच उघडीप दिली. त्यामुळे पूर्व भागातील माण, खटाव, कोरेगावसह इतर तालुक्यांत सद्य:स्थितीत दुष्काळी ‘ढग’ दाटून आले आहेत. आगामी काळात तर जिल्ह्यातील इतर भागातही भीषण स्थिती निर्माण होणार आहे. सध्या पूर्व भागात रब्बीची पेरणी आणि जनावरांचा चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील १५ गावे आणि ५५ वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये आगामी काळात आणखी वाढ होणार आहे.
यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सातारा जिल्ह्यात पाऊस सुरू झाला. पेरणीनंतर पूर्व भागातील माण तालुक्यात पाऊस बरसलाच नाही. त्यामुळे हाती फारसे उत्पन्न आले नाही. पाऊस नसल्याने लहानांसह मोठ्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. तर माणमध्ये आत्तापर्यंत २२४ मिलीमीटर पाऊस झाला असून, हे प्रमाण ५५ टक्के आहे. खटाव तालुक्यात आतापर्यंत ४३९ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
या तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी काही भागात अत्यल्प पाऊस झाला आहे. यामुळे टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. फलटण तालुक्यात ६१ टक्के पाऊस झाला
असला तरी कालवे असल्याने लोकांना टंचाईची फारसी समस्या उद्भवणार
नाही. मात्र, काही भागात जनावरांचा
चारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच कोरेगाव तालुक्यात ३९६ मिलीमीटर पाऊस पडला असून, टक्केवारी ६६ इतकी आहे. कोरेगाव तालुक्यातही पाण्याचे संकट निर्माण होणार आहे. सध्या कोरेगाव तालुक्यात एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
पूर्व भागात अशी स्थिती असताना पश्चिमकडे सतत अडीच महिने पाऊस होता. त्यामुळे कोयनेसह धोम, उरमोडी, कण्हेर, बलकवडी, तारळी धरणे यावर्षी वेळेपूर्वी भरली. कोयनेतून सध्या सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. चिंतेची बाब म्हणजे कोयनेत सध्या ९४ टीएमसीपर्यंत साठा आहे. सातारा तालुक्यातही १०८ टक्के पाऊस झाला आहे. कºहाडमध्ये १०२, जावळी ९६, खंडाळा ९३, वाई तालुक्यात ७७ टक्के पाऊस आत्तापर्यंत झाला आहे. महाबळेश्वरमध्ये आतापर्यंत ५६९१ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
माण, खटाव तालुक्यांत पावसाअभावी खरीप हंगामातील उत्पादनात मोठी घट झाली आहे. अनेक गावांत तर पेरणीसाठी झालेला
खर्चही निघाला नाही. त्यातच आॅक्टोबरपासून दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने रब्बीच्या पेरणीचे
संकट कायम आहे. पूर्व भागात यंदा प्रथमच रब्बी हंगामातील क्षेत्र
मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पिण्याला पाणी नाही तेथे पीक
घेऊन काय फायदा या विवंचनेत शेतकरी आहेत.
कोयनेला ५ तर नवजाला ६ हजार मिलीमीटर
माण, खटाव या दुष्काळी तालुक्यातील पावसाची वार्षिक सरासरी ४०० ते ४५० मिलीमीटर आहे. माण तालुक्यात यंदा निम्माच पाऊस झाला आहे. तर दुसरीकडे महाबळेश्वर येथे ५६९१, कोयनेला ५५०० तर सर्वाधिक नवजा येथे ६००० मिलीमीटर पाऊस झालेला आहे. पावसाची पूर्व आणि पश्चिम भागातील ही तफावत बरेच काही सांगून जाणारी आहे.
खासगी टँकरसह ग्रामपंचायतीवर भर
पाण्याअभावी अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तर काही ठिकाणी खासगी टँकरमधून विकत पाणी घ्यावे लागत आहे. त्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागत आहेत. तर काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.