दुष्काळी शेतकरी गप्प ‘गार’च!

By admin | Published: December 25, 2014 09:43 PM2014-12-25T21:43:44+5:302014-12-26T00:52:16+5:30

रब्बी हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख १७ हजार ६०० हेक्टर आहे. यावर्षी दोन लाख ४५ हजार ९०४ हेक्टरवर पेरणी

Drought farmers silence! | दुष्काळी शेतकरी गप्प ‘गार’च!

दुष्काळी शेतकरी गप्प ‘गार’च!

Next

नितीन काळेल - सातारा  -कधी जेमतेम पाऊस तर कधी दुष्काळ, अशा स्थितीत जगणाऱ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना यंदा निसर्गाचा चांगलाच फटका बसला. मार्च महिन्यात दोन-तीन वेळा अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. फळबागा कोलमडल्या. त्यानंतर डिसेंबर महिन्यातही अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाका
दिल्याने शेतकरी पुन्हा गप्प ‘गार’ झाला. जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळी तर पश्चिमेकडील भाग हा सुजलाम्- सुफलाम् समजला जातो. पूर्व भागात खरीप हंगामात बाजरी, मटकी, कडधान्ये घेण्यात येतात. तर पश्चिम भागात ऊस, सोयाबीन, भात आदींसारखी महत्त्वपूर्ण पीक घेतली जातात. असे असले तरी अलीकडील काही वर्षांत दुष्काळी भागातील आर्थिकस्तर उंचावत असल्याचे दिसत आहे. याला कारण म्हणजे फळबागा. दुष्काळी, माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगावचा काही भाग या तालुक्यांत डाळिंब, द्राक्षांच्या फळबागा होत आहेत. त्याचबरोबर ऊसक्षेत्रातही वाढ होऊ लागली आहे. पाऊस चांगला झाला तर येथील शेतकरी ‘राजा’ होऊनच वावरत असतो; पण दुष्काळात पूर्ण कोलमडून पडतो. मागील दोन वर्षांपूर्वीचा दुष्काळ मागे टाकून येथील शेतकरी पुन्हा उभा राहिला आहे.
जिल्ह्यात यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबल्या. काही ठिकाणी पेरण्याच झाल्या नाहीत. परिणामी खरीप हंगामात ८४.१६ टक्के इतक्याच पेरण्या होऊ शकल्या. खरिपातील सर्वसाधारण क्षेत्र तीन लाख ८३ हजार ९०९ हेक्टर असून, त्या तुलनेत तीन लाख २३ हजार हेक्टरवरच पेरण्या झाल्या. खरीप हंगामात माण तालुक्यातील तीन गावे ५० पेक्षा कमी पैसेवारीची म्हणून जाहीर करण्यात आली होती.
रब्बी हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख १७ हजार ६०० हेक्टर आहे. यावर्षी दोन लाख ४५ हजार ९०४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. शंभर टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उशिरा होऊनही चांगला पाऊस झाला.

खरीप हंगामात काही दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले, काही दुकाने निलंबित करण्यात आली होती. त्यामध्ये खतांचे ९, बियाण्यांचे ८, कीटकनाशक विक्री परवानाधारकांचे ७, खताचे १७ आदींवर कारवाईचा जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत बडगा उगारण्यात आला होता. तसेच बियाण्यांचे ३१९, खतांचे ११६ नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.



जिल्ह्यात यावर्षी १३२ टक्के पाऊस
जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९१८.८९ मि.मी. एवढे आहे. ३१ आॅक्टोबर अखेर जिल्ह्यात १२१६.०२ मि.मी. पाऊस झाला. हंगामाच्या सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची टक्केवारी ही १३२ एवढी आहे. सातारा तालुक्यात ११४ टक्के, जावळी १०२, टक्के, खंडाळा ११६, महाबळेश्वर २५४ टक्के, कोरेगाव ७३ टक्के, माण ८७ टक्के असा पाऊस झाला. दरम्यान, राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने यंदा भात पिकाची नवीन योजना सुरू झाली. ऊस ठिबक सिंचन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शतकोटी वृक्ष लागवडीअंतर्गत साडेचार लाख झाडे लावण्यात आली.


यावर्षी जिल्हा परिषदेने कृषी पर्यटनावर आधारित नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचे प्रस्तावित केले आहे. इच्छुक शेतकऱ्यांना कृषी पर्यटनाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातून त्यांना आर्थिक प्राप्ती होण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले.

Web Title: Drought farmers silence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.