दुष्काळी भागातील ओढे, नाले तुडुंब
By admin | Published: October 2, 2016 12:48 AM2016-10-02T00:48:10+5:302016-10-02T00:48:10+5:30
परतीच्या पावसाने झोडपले : खटाव, पाटण, फलटण तालुक्यांतही संततधार
सातारा : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागासह बहुतांश ठिकाणी शनिवारी सायंकाळी परतीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे दुष्काळी माण, खटाव तालुक्यातील ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांसह अनेकांची त्रेधातिरपीड उडाली.
साताऱ्यात शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सूर्यनारायणाचे दर्शन अधूनमधूनच होत होते. सायंकाळी चारनंतर पावसाला सुरुवात झाली. खंडाळा, शिरवळ, खटाव तालुक्यांतील पुसेगाव, फलटण, आदर्की, साखरवाडी परिसरात जोरदार पाऊस झाला. (प्रतिनिधी)
खटावला शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट
खटाव : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला पावसाने हजेरी लावल्याने नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. तर खरीप पिकाच्या काढणीच्या लगबगीत असलेल्या शेतकऱ्यांना मात्र परतीच्या पावसाने मोठा झटका दिला आहे. खटावसह परिसरात शनिवारी झालेल्या परतीच्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
ओढे, नाले खळाळले
कुकुडवाड : कायम दुष्काळी असणाऱ्या माण तालुक्यातील कुकुडवाड परिसरात घटस्थापनेच्या मुहूर्तावर शनिवारी दुपारी पावसाला सुरुवात झाली. कुकुडवाडसह परिसरात परतीच्या पावसाने झोडपून काढले. कुकुडवाड परिसरातील कुकुडवाडसह ढाकणी, दिवड, वडजल, पुकळेवाडी, समानेवाडी, मस्करवाडी, आगासवाडी, विरळी या परिसरात शनिवारी दमदार पाऊस झाला. पावसामुळे माळरानावरील छोटे नाले तसेच छोटी-मोठी डबकी भरून वाहू लागली आहेत. सुमारे तीन ते चार तास झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता.
लोणंदलाही झोडपले
लोणंद : लोणंदसह परिसरात शनिवारी सकाळपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. एकीकडे दुर्गा मातेची घटस्थापना तर दुसरीकडे जोरदार पाऊस त्यामुळे अनेक मंडळांनी दुर्गादेवीच्या मूर्तीची उशिरा प्रतिष्ठापना केली. पावसामुळे लोणंद बसस्थानकामध्ये पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले आहे. या ठिकाणाहून चालताना प्रवाशांना कसरत करावी लागत आहे.