रब्बीवरही दुष्काळी सावट; सातारा जिल्ह्यात आतापर्यंत अवघी ८० टक्केच पेरणी  

By नितीन काळेल | Published: January 8, 2024 07:10 PM2024-01-08T19:10:56+5:302024-01-08T19:11:15+5:30

सातारा : जिल्ह्यात मागीलवर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने रब्बी पेरणीवरही परिणाम झाला आहे. सध्या पेरणी अंतिम टप्प्यात असताना आतापर्यंत ८० ...

Drought hit Rabi; Only 80 percent sowing in Satara district so far | रब्बीवरही दुष्काळी सावट; सातारा जिल्ह्यात आतापर्यंत अवघी ८० टक्केच पेरणी  

रब्बीवरही दुष्काळी सावट; सातारा जिल्ह्यात आतापर्यंत अवघी ८० टक्केच पेरणी  

सातारा : जिल्ह्यात मागीलवर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने रब्बी पेरणीवरही परिणाम झाला आहे. सध्या पेरणी अंतिम टप्प्यात असताना आतापर्यंत ८० टक्क्यांपर्यंतच पेर गेली आहे. तरीही एकाही प्रमुख पिकाची पेरणी १०० टक्के झालेली नाही. तर गतवर्षी आतापर्यंत ९८ टक्क्यांपर्यंत पेरणी पोहोचली होती. दरम्यान, यंदा उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. या हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे ३ लाख हेक्टरपर्यंत असते. यानंतर रब्बी हंगाम महत्वाचा समजला जातो. यंदाच्या हंगामात २ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र निश्चीत करण्यात आले होते. यामध्ये ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र हे १ लाख ३५ हजार ५३१ हेक्टर क्षेत्र आहे. तर गहू ३७ हजार ३७४ हेक्टर, मका १० हजार हेक्टर, हरभरा २७ हजार ७५३ हेक्टर असे प्रमुख पिकांचे क्षेत्र आहे. तर करडई, सूर्यफूल, तीळ, जवस आदींचे क्षेत्र अत्यल्प आहे. सध्या पेरणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. तरीही ८० टक्क्यांवरच पेरणी झालेली आहे. १ लाख ७१ हजार हेक्टरवर पिके आहे. तर फक्त मका पिकाची पेरणी १३८ टक्क्यांपर्यंत झालेली आहे.

रब्बीत ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. यामध्ये माण तालुक्यात ३८ हजार हेक्टरवर असून खटाव तालुक्यात २० हजार हेक्टर, फटलण तालुका १८ हजार ४०६, कोरेगाव १३ हजार ५००, सातारा तालुका ९ हजार ५३०, पाटण ९ हजार १७६, खंडाळा ८ हजार ४६८ हेक्टर असून महाबळेश्वर वगळता इतर तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र कमी आहे. यंदा ज्वारीची पेरणी फक्त ७५.७६ क्षेत्रावर झालेली आहे. १ लाख २ हजार हेक्टर क्षेत्रावरच ज्वारी आहे. तर सातारा तालुक्यातच १०० टक्क्यांवर ज्वारी पेर आहे. गव्हाची ३२ हजार हेक्टरवर पेर आहे.

टक्केवारीत हे प्रमाण ८६ टक्क्यांवर आहे. यामध्ये कऱ्हाड तालुक्यात सुमारे ६ हजार हेक्टर, पाटण ५ हजार हेक्टर, फलटण ७ हजार हेक्टर, खंडाळा २ हजार ६७५ हेक्टर, वाई तालुका २ हजार ६३१, सातारा २ हजार ८२२ हेक्टर, कोरेगाव १ हजार ६३७ हेक्टर, खटाव १ हजार ५३४ हेक्टर आणि माण तालुक्यात १ हजार २५४ हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. ज्वारीप्रमाणे गहू क्षेत्र पेरणीतही यंदा घट झालेली आहे.

हरभऱ्याची २० हजार ७०३ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. कऱ्हाड तालुक्यात ३ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. तर कोरेगाव तालुक्यात २ हजार ७६९ हेक्टर, खटाव २ हजार ७४९ हेक्टर, फलटण २ हजार ५७५ हेक्टर अशी पेर आहे. पाऊस कमी पडल्याने सर्वच प्रमुख पिकांची पेरणी कमी झालेली आहे. तसेच आगामी काळात पिकांना पाणीही कमी पडणार आहे. त्यामुळे उत्पादनातही घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, मका पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा १० हजार हेक्टवर क्षेत्र होते. प्रत्यक्षात १४ हजार हेक्टरवर मका पीक घेण्यात आले आहे. पेरणीची टक्केवारी १३८ टक्के इतकी आहे.

सातारा तालुक्यातच १०० अन् माणमध्ये अवघी ६५ टक्के पेर..

रब्बी हंगामाचे सर्वाधिक क्षेत्र हे माण तालुक्यात सर्वाधिक आहे. तरीही येथे आतापर्यंत ३० हजार हेक्टरवर पिके घेण्यात आलेली आहे. अवघ्या ६५ टक्के क्षेत्रावरही पेर झालेली आहे. तर सातारा तालुक्यात १०३ टक्के पेरणी झालेली आहे. १५ हजार ४९२ हेक्टरवर पिके आहेत. कऱ्हाड तालुक्यात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून महाबळेश्वरला ९६.८५ टक्के, फलटण ८७ टक्के, खंडाळा ८०, वाई ८४, पाटण ८८.५१, जावळी ७९, कोरेगाव ७४, खटाव तालुक्यात ७३ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

Web Title: Drought hit Rabi; Only 80 percent sowing in Satara district so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.