दुष्काळी माण तालुक्यात बुद्धीचा सुकाळ !

By admin | Published: May 28, 2015 09:53 PM2015-05-28T21:53:51+5:302015-05-29T00:06:25+5:30

बारावीचा निकाल : जिल्ह्यात मिळविला ‘मान’; स्पर्धा परीक्षेमध्येही अग्रेसर

Drought-hit taluka wise! | दुष्काळी माण तालुक्यात बुद्धीचा सुकाळ !

दुष्काळी माण तालुक्यात बुद्धीचा सुकाळ !

Next

सातारा : माण तालुका हा दृष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. येथील मुलांच्या पाचवीलाच दुष्काळ पुजला असला तरी मुलांनी कधी हार पत्करली नाही. विविध स्पर्धा परीक्षांमध्येही माण तालुक्यातील मुलांचे उतीर्णतेचे प्रमाण जास्त असते. बुधवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्येही माण तालुक्याने जिल्ह्यात प्रथम येण्याचा ‘मान’ मिळविला.
ओसाड माळरानातून आणि रखरखत्या उन्हामधून महाविद्यालयात जाणाऱ्या माण तालुक्यातील मुलांना शिक्षण हाच मोठा पर्याय वाटतो. त्यामुळे येथील मुले स्पर्धा परीक्षांमध्येही अग्रेसर आहेत. बारावीच्या निकालामध्येही या मुलांनी आपली क्षमता संपूर्ण जिल्ह्याला दाखवून दिली आहे.बारावीच्या परीक्षेला माण तालुक्यामध्ये एकूण २ हजार ३१७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ हजार २१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात या तालुक्याने ९५.६८ टक्के गुण मिळवून एकूण उत्तीर्ण होण्यात प्रथम क्रमांक मिळविला. तर खंडाळा तालुक्याने द्वितीय आणि जावळी तालुक्याने तृतीय क्रमांक पटकावला. खंडाळा ९५.२२ टक्के तर जावळी तालुक्याचा ९४.८८ टक्के निकाल लागला.तालुकानिहाय टक्केवारी : सातारा ९२.५८, कऱ्हाड ९१ टक्के, खटाव ९३.५२, कोरेगाव ९२.५२, महाबळेश्वर ९३.१३, फलटण ९४.०४, पाटण ९०.७०, वाई ८८.०१ अशी आहे.जिल्ह्यात १० तालुक्यामध्ये ९० टक्केच्या वरती विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. मात्र वाई तालुका हा एकमेव ९० टक्क्यांची खाली आहे. वाई तालुक्यामध्ये २ हजार ४४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २ हजार १५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या तालुक्याचा एकूण ८८.०१ टक्के निकाल लागला.
दरम्यान, विद्यार्थ्यांना शाळेत गुणपत्रिका देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)



डीजे कॉलेज ‘टॉपवन’...
साताऱ्यातील महाविद्यालयांमध्ये धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय अग्रेसर आहे. या कॉलेजचा ९६.३६ टक्के निकाल लागला. महाराजा सयाजीराव विद्यालयाचा ९५.४५ टक्के, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा ९४.१२, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचा ९४.१२ टक्के निकाल लागला.
आईच बनली ‘पासवर्ड’
बारावीचा निकाल पाहताना शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर पासवर्ड विचारला जात होता. पासवर्ड म्हणून विद्यार्थ्यांना आईचे नाव टाकावे लागत होते. बारावीच्या निकालाच्या निमित्ताने या आगळ्यावेगळ्या ‘पासवर्ड’मुळे विद्यार्थ्यांमध्ये याची कुतुहलाने चर्चा सुरू होती.

शाहू अ‍ॅकॅडमीचा ९७ टक्के निकाल
सातारा : विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छ. शाहू अ‍ॅकॅडमी अ‍ॅण्ड सायन्स ज्युनियर कॉलेज या कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वीचा ९७ टक्के निकाल लागला. वेदांतिकाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छ. शाहू अ‍ॅकॅडमी अ‍ॅण्ड सायन्स ज्युनियर कॉलेज या कनिष्ठ महाविद्यालयाने उज्वल यश संपादन केले आहे. मुख्याध्यापिका डिंपल जाधव आणि सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम यामुळे या कनिष्ठ महाविद्यालयाने निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांनी सत्कार केला.

Web Title: Drought-hit taluka wise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.