‘दुष्काळी गाव’ कागदावरच

By admin | Published: December 27, 2015 11:00 PM2015-12-27T23:00:43+5:302015-12-28T00:45:02+5:30

कोरेगाव उत्तर : सुविधांपासून अनेक गावे आजही वंचित; योजनेत समावेश करण्याची मागणी

'Drought-hit village' on paper | ‘दुष्काळी गाव’ कागदावरच

‘दुष्काळी गाव’ कागदावरच

Next

वाठार स्टेशन : शासनाने जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश दुष्काळी गाव म्हणून जाहीर केला. यामध्ये कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांचा समावेश करण्यात आला; मात्र दुष्काळी गाव म्हणून ज्या सुविधा मिळणे अपेक्षित होत्या, त्या सुविधांपासून आजही अनेक
गावे वंचितच राहिल्याने शासनाची ‘दुष्काळी गाव’ योजना केवळ कागदावरच राहिली आहे.
चालूवर्षी राज्यात अनेक भागांत पावसाने दिलासा दिला असला तरी कोरेगाव तालुक्यात मात्र आत्तापासूनच दुष्काळाच्या झळा सुरू झाल्या आहेत. तालुक्याच्या उत्तर भागातील जवळपास २६ गावांमध्ये आत्तापासूनच पाण्याची टंचाई भासत आहे. गावोगावच्या विहिरी, पाझर तलाव, कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे.
पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे काही दिवसांतच अनेक गावांना टँकर सुरू करावे लागणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षातील दुष्काळ मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. यासाठी आत्तापासूनच दुष्काळ निवारणाचे प्रयत्न होणे गरजेचे
आहेत.
शासनाने काही दिवसांपूर्वीच दुष्काळी गावांची यादी जाहीर करून जनतेला दिलासा देण्याचे काम केले. या भागातील अनेक गावांचा समावेशही यामध्ये झाला; परंतु याच भागातील देऊर, अंबवडे (सं) वाघोली, बनवडी, अरबवाडी सारख्या गावांमध्ये दुष्काळ असूनही या गावांचा समावेश दुष्काळी गावाच्या यादीत झाला
नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत असून या गावांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याची मागणी होत आहे.
ज्या गावांचा समावेश दुष्काळी गाव म्हणून झाला, त्या गावाला मात्र अद्याप दुष्काळी सुविधा मिळाल्या नाहीत. या उलट बँका, पतसंस्थाकडून वेगाने वसुलीचा धडाका सुरू
झाला, तर महावितरणकडूनही वीजबिलाबाबत कोणतीही सुविधा या भागातील शेतकऱ्यांना मिळाली नाही. यामुळे या दुष्काळी गावातील शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत
आहे.
सद्य:स्थितीत वसना उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील देऊर परिसरात काही दिवस पाणी सोडल्याने गावाच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना काही दिवसांचा दिलासा मिळाला आहे. मात्र, या पाण्यामुळे देऊरकरांची पाणी समस्या सुटलेली नाही. शासनाने या भागातील दुष्काळासाठी आत्तापासूनच काही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. (वार्ताहर)

पाझर तलावही कोरडे..
तालुक्यातील वाठार स्टेशन, पिंपोडे बु, वाघोली, सोनके, करंजखोप, रणदुल्लाबाद, चवणेश्वर, नांदवळ, नायगाव, सोळशी, आसनगाव, चौधरवाडी, विखळे, तडवळे, तळिये, बिचुकले, देऊर, राऊतवाडी, दहिगाव या गावांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे या गावांतील पाझर तलाव कोरडे पडले आहेत. यामुळे या भागातील हक्काचा आर्थिक देणारा ऊस आता गायब झाला आहे, तर असणारी पीक परिस्थिती वाचविण्यासाठी शेतकरी तारेवरची कसरतच करत आहे.

ज्या गावांचा समावेश दुष्काळी गाव म्हणून करण्यात आल्या त्या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लाईटबिल, विद्यार्थी प्रवेश शुल्क माफी तसेच कर्जाबाबत शिथिलता आणून या उर्वरित गावांचा फेरसर्व्हे करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

Web Title: 'Drought-hit village' on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.