सातारा जिल्ह्यातील आणखी ६५ मंडलात दुष्काळ; १४ मंडले निकषाबाहेर , वाई अन् खंडाळा तालुक्यांत पूर्वीच जाहीर

By नितीन काळेल | Published: November 11, 2023 01:17 PM2023-11-11T13:17:45+5:302023-11-11T13:17:53+5:30

राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी दुष्काळ तालुके जाहीर केले यामध्ये साताऱ्यातील वाई आणि खंडाळ्याचा समावेश केला.

Drought in 65 more mandals of Satara district | सातारा जिल्ह्यातील आणखी ६५ मंडलात दुष्काळ; १४ मंडले निकषाबाहेर , वाई अन् खंडाळा तालुक्यांत पूर्वीच जाहीर

सातारा जिल्ह्यातील आणखी ६५ मंडलात दुष्काळ; १४ मंडले निकषाबाहेर , वाई अन् खंडाळा तालुक्यांत पूर्वीच जाहीर

नितीन काळेल 

सातारा : राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी दुष्काळ तालुके जाहीर केले यामध्ये साताऱ्यातील वाई आणि खंडाळ्याचा समावेश केला. त्यानंतर आता महसूलमंडलनिहाय दुष्काळसदृश्य स्थिती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झालेली सातारा जिल्ह्यात आणखी ६५ मंडले स्पष्ट झाली आहेत. याठिकाणी आता दुष्काळी सवलती लागू होणार आहेत. तर १४ मंडलांना वगळण्यात आलेले आहे.
जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पडतो. या पावसावरच खरीप आणि रब्बी हंगामाचे चित्र अवलंबून असतात. यावर्षी मात्र, पर्जन्यमान कमी झालेले आहे. जून ते सप्टेंबर या चार पावसाळी महिन्यांचा विचार करता सरासरीच्या ७० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रमुख धरणांत कमी पाणीसाठा आहे. दुष्काळी भागात चारा आणि पाणीटंचाईचेही संकट आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांसह राजकीय पक्षाकडूनही मागणी होत होती. त्यातच कमी पर्जन्यमानामुळे राज्य शासनाने मागील महिन्यातच राज्यातील ४० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळ्याचा समावेश होता.

यानंतर दुष्काळी तालुक्यातून जोरदार टिकास्त्र सुरू झाले. कारण, माण, खटाव, फलटण, कोरेगाव हे तालुके पूर्वीपासून दुष्काळी आहेत. आजही या तालुक्यात पाण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. चारा तसेच पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातच लोकप्रतिनिधींनीही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार गुरुवारी शासनाने महसूल मंडलात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. अशा १७८ तालुक्यांतील ९५९ महसूल मंडलात दुष्काळ जाहीर करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील आणखी ६५ मंडलांचा समावेश आहे.

७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झालेली ६५ महसूल मंडले...

सातारा तालुका : सातारा, खेड, वर्ये, कण्हेर, शेंद्रे, नागठाणे, अंबवडे, वडूथ, तासगाव, अपशिंगे.
जावळी : आनेवाडी, कुडाळ.

पाटण : ढेबेवाडी, चाफळ, तारळे, मल्हारपेठ, तळमावले, कुठरे, मरळी.
कऱ्हाड : कऱ्हाड, उंब्रज, इंदोली, सुपने, मसूर, कवठे, कोपर्डे हवेली, सैदापूर, शेणोली, कोळे, उंडाळे, काले, मलकापूर.

कोरेगाव : कोरेगाव, कुमठे, रहिमतपूर, शिरंबे, वाठार स्टेशन, वाठार किरोली, पिंपोडे बुद्रुक, सातारारोड, किण्हई.
खटाव : खटाव, आैंध, पुसेगाव, बुध, वडूज, पुसेसावळी, मायणी, निमसाेड, कातरखटाव.

माण : दहिवडी, मलवडी, कुकुडवाड, म्हसवड, मार्डी, शिंगणापूर.
फलटण : फलटण, आसू, होळ, गिरवी, आदर्की बुद्रुक, वाठार निंबाळकर, बरड, राजाळे, तरडगाव.

शासन सवलती लागू; १४ मंडले बाहेर...

वाई आणि खंडाळा तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित नऊ तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. याठिकाणी शासन निर्णयानुसार सवलती लागू होणार आहेत. तर दुष्काळ निकषात १४ मंडले बसत नाहीत ती अशी.
सातारा तालुका : दहिवड, परळी

जावळी : मेढा, बामणोली, केळघर, करहर
पाटण : पाटण, म्हावशी, हेळवाक, मोरगिरी

महाबळेश्वर : महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, लामज

Web Title: Drought in 65 more mandals of Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.