साताऱ्यात पूर्व भागात दुष्काळी झळा; जनावरांना चारा नाही; ६० गावांना टँकरने पाणीपुरवठा
By नितीन काळेल | Published: August 17, 2023 07:07 PM2023-08-17T19:07:48+5:302023-08-17T19:08:44+5:30
शासनाने लवकर चारा छावणी सुरु करण्याची मागणी
सातारा : पश्चिम भागात धो-धो कोसळणारा पाऊस पूर्वेकडे वाट पाहूनही आला नाही. पावसाळ्यातील अडीच महिन्यात ओढ्यालाही पाणी नाही. त्यामुळे आज पूर्व दुष्काळी भागात शेतकऱ्यांची जनावरे जगविण्यासाठी परवड सुरू आहे. त्यामुळे शासनाने लवकर चारा छावणी सुरु करण्याची मागणी होत आहे. तर जिल्ह्यात सध्या ६० गावे आणि ३४५ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये आणखी वाढ होणार आहे.
जिल्ह्यात किमान पाच वर्षांतून एकदातरी पूर्व भागाकडे पर्जनम्यान कमी राहते. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले आहेत. पण, पश्चिम भाग वगळता दुष्काळी भागाकडे वरुणराजाची वक्रदृष्टीच राहिली आहे. त्यातच मागील १० दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्रच दडी आहे. त्यामुळे मोठी धरणेही भरली नाहीत. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशातच दुष्काळी तालुक्यात भीषणता अधिक वाढत चालली आहे. जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यामुळे बळीराजाची आता परवड सुरू असल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे.
सध्यस्थितीत जिल्ह्यात सर्वात अधिक भीषणता ही माण तालुक्यात सुरू आहे. तालुक्यात १०५ गावे असताना त्यातील ४२ गावांना आणि ३०८ वाड्यांना टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. यावर जवळपास ७० हजार नागरिकांची तहान अवलंबून आहे. या लोकांना आणि जनावरांना ४८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तरीही पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी पाण्यासाठी रानोमाळ भटकंतीची वेळ लोकांवर आलेली आहे.
त्याचबरोबर खटाव तालुक्यात टंचाईची स्थिती कमी आहे. चार गावांत टंचाई असून साडे हजार नागरिकांना चार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. फलटण तालुक्यातीलही ६ गावे आणि ३७ वाड्यांची तहान टॅंकरच्या पाण्यानेच भागत आहे. तालुक्यातील १४ हजार जनावरांनाही टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे. कोरेगाव तालुक्यातही ६ गावांत टंचाई निर्माण झालेली आहे. या गावांसाठी तीन टॅंकर सुरू आहेत. तर वाई तालुक्यातील दोन गावांसाठी टॅंकर सुरू आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यात टंचाई आहे.