सातारा जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली, टॅंकरची संख्या १०० च्या उंबरठ्यावर
By नितीन काळेल | Published: September 26, 2023 05:40 PM2023-09-26T17:40:07+5:302023-09-26T17:40:52+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात अजुनही पावसाची हुलकावणीच असल्याने दुष्काळाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे आताच ९४ गावे आणि ४३२ ...
सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात अजुनही पावसाची हुलकावणीच असल्याने दुष्काळाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे आताच ९४ गावे आणि ४३२ वाड्यांसाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. टंचाई निवारणासाठी सध्या ९९ टॅंकर सुरू आहेत.
जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. पश्चिमेकडेही पर्जन्यमान अपुरे झाले आहे. त्यामुळे बहुतांशी धरणे भरलेली नाहीत. तर पूर्व भागात पावसाने डोळे वटारलेलेच असून आतापर्यंत ५० टक्क्यांपर्यंतच पाऊस झाला आहे. आगामी काही दिवसांत पाऊस झाल्यास परिस्थितीत सुधारणा होणार आहे. अन्यथा पुढीलवर्षीच्या पावसाळ्याची वाट पहावी लागणार आहे. तर सध्यस्थितीत पाऊस नसल्याने पाच तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
माण तालुक्यात अपुरे पर्जन्यमान आहे. त्यामुळे दुष्काळ वाढत चालला आहे. तसेच गावोगावच्या ओढ्यांना पाणी नाही. विहिरी आटल्या असून शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. माणमध्ये १०५ गावे आहेत. त्यामधील ५१ गावे आणि तब्बल ३७२ वाड्यांना टॅंकर सुरू आहे. यावर ८१ हजार ५१६ नागरिक आणि ६१ हजार ५१४ पशुधनाची तहान अवलंबून आहे. तर माण तालुक्यातील लोकांसाठी ६४ टॅंकर सुरू आहेत. तालुक्यातील पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, हस्तनपूर, भाटकी, खडकी, धुळदेव, वरकुटे- म्हसवड, ढाकणी, कारखेल, संभूखेड, वाकी, रांजणी, पळशी, मार्डी, खुटबाव, पर्यंती, इंजबाव, वारुगड, परकंदी, महिमानगड, पांढरवाडी, पिंगळी बुद्रुक, सुरुपखानवाड, विरळी, कुरणेवाडी आदीं गावांसह वाड्यावस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
खटाव तालुक्यातीलही टॅंकरग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. २१ गावे आणि २४ वाड्यांसाठी टॅंकर सुरू आहेत. २९ हजार नागरिक आणि ८ हजार पशुधनासाठी २४ टॅंकर सुरू आहेत. तालुक्यातील मांडवे, गोसाव्याचीवाडी, कणसेवाडी, खातवळ, येलमरवाडी, पडळ, कान्हरवाडी, धोंडेवाडी, दातेवाडी, तडवळे आदी गावांसाठी टॅंकर सुरू झाले आहेत. फलटण तालुक्यातही पाणीटंचाई वाढलेली आहे. १० गावे ३६ वाड्यांसाठी १२ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सुमारे १५ हजार नागरिक आणि १४ हजार ४९१ पशुधनाला या टॅंकरचा आधार आहे.
तालुक्यातील सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, चांभारवाडी, घाडगेमळा आदी ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे.
कोरेगाव तालुक्यातील १० गावांतील १५ हजार नागरिक आणि अडीच हजार जनावरांना टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. तालुक्यातील टंचाई निवारणासाठी ८ टॅंकर धुरळा उडवत फिरत आहेत. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडीत टंचाई आहे. वाई तालुक्यातील चांदक आणि आनंदपूर या दोन गावांसाठी टॅंकर सुरू आहे. यावर २ हजार नागरिक आणि ४७५ पशुधन अवलंबून आहे. तर पाटण, जावळी, खंडाळा, महाबळेश्वर, सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यात टॅंकर सुरू नाहीत.
दीड लाख नागरिक, ८७ हजार पशुधन बाधित...
जिल्ह्यात सध्याही पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे टंचाईची स्थिती वाढत चालली आहे. सध्या ९९ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या टॅंकरवर १ लाख ४२ हजार २७७ नागरिक आणि ८७ हजार ३८४ पशुधन अवलंबून आहे. तर १९ विहिरी आणि ३४ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. सध्या शासकीय ९ आणि खासगी ९९ टॅंकरद्वारे टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.