अवकाळीची बाधा, त्यात ढगाळ हवामानाची गदा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 01:40 PM2021-12-04T13:40:57+5:302021-12-04T13:41:22+5:30
रब्बीची शेतीपिके संपूर्णपणे फळबागासह पाण्याखाली राहिल्याने हंगामाचे संपूर्ण नुकसान झाले आहे.
खंडाळा : खंडाळा तालुक्यात अवकाळी पावसाने हाहाकार केला आहे. रब्बीची शेतीपिके संपूर्णपणे फळबागासह पाण्याखाली राहिल्याने हंगामाचे संपूर्ण नुकसान झाले आहे. या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच ढगाळ हवामानाचे सावट शेतीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे अवकाळीची बाधा त्यासोबतच दूषित वातावरणाची बाधा झाल्याची स्थिती ओढावली आहे.
तालुक्याच्या शेतीचे पावसाने नुकसान झाले आहे. त्यानंतर अवकाळी पावसाने तालुक्याच्या धुमाकूळ घातला. यामध्ये बहुतांशी शेती पाण्याखाली गेली. शेतामध्ये पाणी घुसल्याने शेतपिकाचेही मोठे नुकसान झाले. विशेषतः गहू, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले.
आता गेल्या दोन दिवसांत ढगाळ वातावरणाचे सावट राहिल्याने खंडाळा तालुक्यातील विविध भागातील ऊस, भुईमूग, टोमॅटो, कांदा तसेच भाजीपाल्याची पिके व काही फळबागा यावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. अशा प्रकारच्या हवामानामुळे कांदा पिकावर करपा रोग, भाजीपाल्याच्या पिकावर अळीचा व किडीचा प्रादुर्भाव तसेच वेली वर्गातील पिकांवर मुरकुटा रोग पसरण्याची भीती वाढली आहे.
खंडाळा तालुकाच्या एकूण क्षेत्रापैकी रब्बी हंगामात आठ हजारांपेक्षा अधिक क्षेत्रात पिकांची लागवड झाली होती. यापैकी तालुक्याच्या ६७ गावांमध्ये बहुतांशी नुकसान झाल्याचे समोर आले होते. आता या नुकसानीतून बाहेर पडण्यापूर्वीच दूषित हवामानाने घेरल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
कांद्याच्या आगाराला बाधा..
खंडाळा तालुक्याचे कांदा हे प्रमुख पीक आहे. या नगदी पिकावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने कांदा पिकाची पात मुरकटली आहे, तसेच काही ठिकाणी करपा रोगाची लागण होऊ लागली आहे. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीलाच प्रादुर्भाव झाल्याने पिकांची उत्पादन क्षमता घटणार आहे. कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या या तालुक्यातच मोठे नुकसान झाले आहे. शेतीवर एकामागे एक संकट राहिल्यास शेतकरी उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गावोगावच्या ओढ्यांना पाणी....
खंडाळा तालुक्यातील सर्वच भागात सलग तीन दिवस पावसाचा जोर आहे. त्यामुळे गावोगावच्या ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे. काही गावांतून ओढ्याचे पाणी शेतीच्या भागात शिरल्याने पिके पाण्यात गेली आहेत. या पिकांची पाहणी महसूल व कृषी प्रशासनाने करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. संपूर्ण पिकांचे नुकसान झाले असताना आता ढगाळ हवामानाच्या कोंडीत शेतकरी सापडला आहे. आमच्या नवीन पीक लागवडीवर तांबेरा आणि करपा रोग पसरण्याची भीती आहे. अगोदरच शेतकरी उघड्यावर आला असताना हे पुन्हा संकट म्हणजे दुष्काळात तेरावा अशी स्थिती आहे. -प्रतीक ढमाळ, शेतकरी केसुर्डी