रब्बीवर दुष्काळाचे सावट; साताऱ्यात सव्वा लाख हेक्टरवर पेर, पेरणी किती..जाणून घ्या

By नितीन काळेल | Published: November 23, 2023 06:52 PM2023-11-23T18:52:57+5:302023-11-23T18:53:17+5:30

सातारा : जिल्ह्यात खरीपनंतर रब्बी हंगाम मोठा घेण्यात येतो. पण, यंदा पावसाअभावी या हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. कारण, डिसेंबर ...

Drought on Rabi season; Planted on half a lakh hectares in Satara | रब्बीवर दुष्काळाचे सावट; साताऱ्यात सव्वा लाख हेक्टरवर पेर, पेरणी किती..जाणून घ्या

रब्बीवर दुष्काळाचे सावट; साताऱ्यात सव्वा लाख हेक्टरवर पेर, पेरणी किती..जाणून घ्या

सातारा : जिल्ह्यात खरीपनंतर रब्बी हंगाम मोठा घेण्यात येतो. पण, यंदा पावसाअभावी या हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. कारण, डिसेंबर महिना उजाडत आलातरी वेग नसल्याने आतापर्यंत ५३ टक्के म्हणजे १ लाख १३ हजार हेक्टरवरच पेरणी झालेली आहे. तर भविष्यात पाणी कमी पडण्याच्या भीतीने शेतकऱ्यांत पेरणीबद्दल धाकधूक कायम आहे.

जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. सध्यस्थितीत १ लाख हेक्टरवर ऊस राहतो. त्यामुळेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचीही संख्या वाढत चालली आहे. तरीही जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे प्रमुख दोन हंगाम मोठ्या प्रमाणात घेतले जातात. खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख हेक्टरपर्यंत राहते. तर रब्बीचे २ लाख १३ हजार २४४ हेक्टर निश्चित करण्यात आलेले आहे. 

सध्या रब्बीच्या हंगामावर दुष्काळाचे सावट गडद आहे. कारण, या हंगामातील सर्वाधिक क्षेत्र हे दुष्काळी तालुक्यात अधिक राहते. यामध्ये माण तालुक्यात ४६ हजार ४१८ हेक्टर असून फलटणला सुमारे ३१ हजार, खटाव २९ हजार ८२१, कोरेगाव २१ हजार २६६, सातारा तालुका १४ हजार ९७०, खंडाळा १४ हजार हेक्टर, पाटण १७ हजार ८०९, कऱ्हाड १४ हजार ७३२, जावळी ८ हजार हेक्टर, वाई १४ हजार ६८९ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६४५ हेक्टर क्षेत्र आहे. पण, यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात तरी रब्बीच्या पेरणीवर परिणाम होण्याची भीती आहे. या तालुक्यांत यावर्षी सरासरीच्या ५० ते ६५ टक्क्यांपर्यंतच पाऊस झालेला आहे. त्यामुळे पेरणी केलीतर पुढे पिकांना पाणी मिळणार का ? याची शास्वती नाही. परिणामी शेतकऱ्यांचे पेरणीचे धाडस करत नाहीत.

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १३ हजार २५१ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हे प्रमाण ५३.११ टक्के इतके आहे. यामध्ये माण तालुक्यात सुमारे ५८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर खटावमध्ये ६५ टक्के, सातारा ७४, जावळी ३८, पाटण ७० टक्के, कऱ्हाड २१, कोरेगाव ६०, फलटण ३९, खंडाळा ३८, वाई तालुक्यात ४५ आणि महाबळेश्वर तालुक्यात ९ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. या आकडेवारीवरुन दुष्काळी तालुक्याततरी १०० टक्के पेरणी होणार का याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.

ज्वारीची ८८ हजार हेक्टरवर पेरणी..

जिल्ह्यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र हे १ लाख ३५ हजार ५३१ हेक्टर आहे. आतापर्यंत प्रत्यक्षात ८८ हजार ५२० हेक्टरवर पेरणी झालेली आहे. त्यातच ज्वारीची पेरणी आॅक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या काही दिवसांत करण्यात येते. पाऊस कमी असल्याने यंदा ज्वारीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. कारण, ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र माणमध्ये ३८ हजार ५३४ हेक्टर आहे. येथे २४ हजार हेक्टरवर ज्वारी पेरणी झाली. यापुढे ज्वारीची पेरणी होणार नाही. तर खटावला २० हजार हेक्टर क्षेत्र असलेतरी सुमारे १४ हजार हेक्टरवर पेर आहे. कोरेगावमध्ये १० हजार ६९४ आणि फलटण तालुक्यात ८ हजार ४१३ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झालेली आहे.

खरीपात १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर..

जिल्ह्यातील खरीप हंगाम हा पावसाळ्यातच असतो. पण, यंदा जून आणि जुलैमध्येही पाऊस कमी पडला. त्यामुळे याचा परिणाम पेरणीवर झाला. खरीप पेरणी ९३ टक्केच झाली. त्यामुळे १९ हजार हेक्टर क्षेत्र हे नापेर राहिले होते. यामध्ये बाजरीचे क्षेत्र सर्वाधिक होते. पण, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झालेली.

ओढे काेरडे, विहिरींचा तळ..

रब्बी हंगाम प्रामुख्याने दुष्काळी तालुक्यातच मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. पण, या तालुक्यातील बहुतांशी ओढे काेरडे पडलेले आहे. विहिरींनी तळ गाठलेला आहे. यामुळे शेतकरी पेरणी करण्यास कचरत आहेत. आता पेरणी केलीतर जानेवारीपासून पिकांना पाणी मिळणे अवघड होऊन जाणार आहे.

Web Title: Drought on Rabi season; Planted on half a lakh hectares in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.