दुष्काळी भागातील पेरणीला पाण्याअभावी ब्रेक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:41 PM2018-11-14T22:41:32+5:302018-11-14T22:41:35+5:30
सातारा : यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने पूर्व भागात पाण्याची उपलब्धता आणि जमिनीत पुरेशी ओल नाही, त्यामुळे रब्बी पेरणीच्या ...
सातारा : यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने पूर्व भागात पाण्याची उपलब्धता आणि जमिनीत पुरेशी ओल नाही, त्यामुळे रब्बी पेरणीच्या क्षेत्रात यंदा घट होणार आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात ३८.८१ टक्के तर माण तालुक्यात अवघ्या १७.५३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. फलटण आणि खंडाळा तालुक्यातही कमी पेरणी झाल्याचे दिसत आहे. विशेषत: माण आणि खटाव तालुक्यांतील शेतकऱ्यांसमोर पेरणीचे खरे संकट असून, पेरणीसाठी काही दिवसच राहिले आहेत.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगाम घेण्यात येतो. तर साधारणपणे आॅक्टोबर महिन्यापासून पेरणी होते. चांगला पाऊस झाला तरच शेतकºयांना उत्पादन मिळते; पण अनेकवेळा पावसाअभावी पेरण्या करूनही हाती फारसे उत्पन्न येत नाही. सध्या अशीच स्थिती जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामध्ये माण, खटावला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असताना शेतीसाठी पाणी मिळणे अवघड झाले आहे. त्यातच जमिनीत ओल नसल्याने पेरणी करून काय फायदा, असा प्रश्न शेतकºयांसमोर आहे. त्यामुळे शेतकºयांनी पेरणीकडे पाठ फिरवली आहे. तर यापुढे पाऊस पडणार नसल्याने चारा नाही, जनावरे कशी जगवावीत? असाही प्रश्न आहे.
सातारा जिल्ह्यात सर्वसाधारणपणे २ लाख १४ हजार ८२२ हेक्टर क्षेत्र हे रब्बी हंगामातील आहे. त्यामध्ये ज्वारीचे सर्वाधिक असून, १ लाख ३९ हजार ११२ हेक्टर आहे. त्याखालोखाल गव्हाचे ३४ हजार ४७३ हेक्टर आहे तर मका १० हजार ९४१, हरभरा २८ हजार ८६३ हेक्टर आहे. रब्बी हंगामात ज्वारी मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. जिल्ह्यात सर्वाधिक माण तालुक्यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ६६५ हेक्टर आहे. त्याखालोखाल खटाव आणि फलटण तालुक्यात क्षेत्र आहे; पण यंदा जिल्ह्यात आतापर्यंत ज्वारीची अवघी ४७.५० टक्के म्हणजेच ६६ हजार ८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. माणमध्ये सर्वाधिक क्षेत्र असूनही आतापर्यंत फक्त ४६८८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार ४७३ हेक्टर असले तरी आतापर्यंत ८.०६ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. हरभरा पेरणीचे क्षेत्रही ३४.४७ टक्के इतकेच आहे.
आता नोव्हेंबर महिना अर्धा झाला असताना जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ३८.८१ टक्के पेरणी झाली आहे. जमिनीत ओल कमी आणि पाण्याची उपलब्धता नसल्यानेच पेरणी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. आता यापुढे माण तालुक्यात बहुतांशी गावात पेरणी होणार नाही. कारण, ओल नसल्याने शेतकºयांनी पेरणीची आशा सोडून दिली आहे. त्यामुळे माण तालुक्यातील पेरणीत यंदा मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.
माणमध्ये अद्याप गहू पेरणी नाही...
सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस झाला की सुरुवातीला ज्वारीची पेरणी करण्यात येते. त्यानंतर गहू, हरभरा घेण्यात येतो; पण आता नोव्हेंबर महिना मध्यावर आला. त्यातच पाऊस नसल्याने पूर्व भागात गहू आणि हरभºयाचे क्षेत्र अत्यल्प होणार आहे. या दोन्ही पिकांचे क्षेत्र ५० टक्क्यांच्या वर जाईल की नाही, अशी साशंकता निर्माण झाली आहे. कारण माण तालुक्यात आतापर्यंत तरी गहू पेरणीची नोंद झाली नसल्याचे दिसून आले आहे. तर पश्चिम भागात पाऊस झाला असल्याने पेरणी चांगली होईल, असा अंदाज आहे.
ज्वारी लागली वाळू...
माण, खटाव तालुक्यांतील अनेक गावांत असणाºया ओलीवर शेतकºयांनी आॅक्टोबर महिन्यात ज्वारीची पेरणी केली होती. मात्र, त्यानंतर पाऊस झाला नाही. सध्या उगवून आलेली ज्वारी जळू लागली आहे. तर अनेक शेतकºयांनी मशागत करून जमीन मोकळी ठेवली आहे.