कृष्णा, कण्हेर, उरमोडीच्या पेटलेल्या पाण्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा उतारा; अधिकाऱ्यांना केल्या सूचना
By नितीन काळेल | Published: November 21, 2023 06:39 PM2023-11-21T18:39:07+5:302023-11-21T18:39:23+5:30
सिंचनच्या पाण्यासाठी साताऱ्यातील शेतकरी आक्रमक
सातारा : जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने दुष्काळी स्थिती उद्भवली असून पाणीप्रश्न पेटू लागला आहे. यावरुनच सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धरणातील पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप करुन सिंचन भवनात आंदोलन केलेले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेत कृष्णा, उरमोडी नदीवरील सातारा तालुक्यातील बंधारे भरुन देण्याचे आश्वासन दिले. तसेच याबाबत जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनाही सूचना केली आहे.
जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली असून धरणांतही कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध भागातून धरणांमधील पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न पेटू लागलाय. कृष्णा, उरमोडी नदी आणि कण्हेर कालवा लाभक्षेत्रात पाणी सोडण्यासाठी सातारा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. यासाठी आक्रमक पवित्रा घेत साताऱ्यातील कृष्णानगरच्या सिंचन विभागात दोनवेळा ठिय्या आंदोलनही करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आलेले. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरीही उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली, माहिती घेतली. त्यानंतर जिल्ह्यात टंचाईची स्थिती आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे लागत आहे. तरीही कोणावर अन्याय होणार नाही ही भूमिका आहे. यासाठी जलसंपदा विभागानेही नियमबाह्य पध्दतीने पाणी सोडू नये. असे कोणी केल्यास संबंधितांची गय केली जाणार नाही, असा इशाराही दिला. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृष्णा आणि उरमोडी नदीतील बंधारे पाण्याने भरुन देण्याचे आश्वासनही दिले. त्यामुळे पाणी प्रश्नावर तात्पुरतातरी पडदा पडला आहे.
या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव सांळुखे, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ यांच्यासह सुधाकर शितोळे, हणमंत शेडगे, तुकाराम शेडगे, बाबासाहेब घोरपडे, राजू घाडगे, विकास घोरपडे, दिपक सांवत, गजानन देशमुख, धनाजी घाडगे, धोम संघर्ष समितीचे सी. आर. बर्गे, रणजित फाळके, नंदकुमार पाटील, मोहन जाधव, झेले-पाटील व शेतकरी उपस्थित होते.