गोडोली येथील तळ्यात बुडणार्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:39 AM2021-04-10T04:39:05+5:302021-04-10T04:39:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गोडोली तळ्यात बुडणाऱ्या महिलेचे गोडोली चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी प्राण वाचवले. गोडोली पोलीस चौकीमध्ये गुरुवार, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गोडोली तळ्यात बुडणाऱ्या महिलेचे गोडोली चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी प्राण वाचवले.
गोडोली पोलीस चौकीमध्ये गुरुवार, दिनांक ७ रोजी रात्री अकराच्या सुमारास गुन्हे निर्गतीचे काम पोलीस नाईक दगडे हे करीत असताना चाचाने जेवणाचा दिलेला डबा आणणेसाठी ते चौकीबाहेर गेले होते. त्यावेळी गोडोली पोलीस चौकीशेजारी असणाऱ्या तळ्यामध्ये कोणीतरी पाण्यात बुडून मदतीसाठी धडपडत असल्याचे व गटांगळ्या खात असल्याचे पोलीस नाईक दगडे यांना दिसले. त्यांनी तत्काळ चौकी अंमलदार पोलीस हवालदार जाधव व होमगार्ड सूर्यवंशी यांना माहिती दिली. दरम्यान, याठिकाणी कामानिमित्त आलेले सातारा सिव्हील हॉस्पिटलचे डॉ. मुल्ला यांनी गोडोली तळ्यामध्ये सुरू असलेली पोलिसांची धावपळ पाहून तेदेखील मदतीला धावले. होमगार्ड सूर्यवंशी, हवालदार जाधव व पोलीस नाईक दगडे यांच्या मदतीने गटांगळ्या खात असलेल्या महिलेला त्यांनी वेळीच पाण्याबाहेर काढले. यावेळी डॉ. मुल्ला यांनी महिलेची तपासणी करुन महिला ठीक असल्याचे सांगितले. या महिलेला पीसीआर नं. १चे नाईट ड्युटी पोलीस नाईक यादव व होमगार्ड यांच्यासोबत चालक पोलीस नाईक कोकणी यांनी त्यांच्या राहत्या घरी सुखरुप पोहोच केले.
संबंधित महिलेस जीवदान दिल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.