सदर बझार येथे औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:02 AM2021-05-05T05:02:54+5:302021-05-05T05:02:54+5:30
औषध फवारणी सातारा : सदर बझार परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश रुग्ण आढळू लागले आहेत. अनेक रुग्णांवर शहरातील ...
औषध फवारणी
सातारा : सदर बझार परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश रुग्ण आढळू लागले आहेत. अनेक रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पाश्वर्भूमीवर सातारा पालिकेकडून ठिकठिकाणी औषध फवारणी केली जात आहे. आरोग्य विभागाकडून आठवड्यातून एकदा या भागात स्वच्छता मोहीम राबविली जात असून, कचऱ्याने तुडुंब भरलेली गटारे व नाले स्वच्छ केले जात आहेत.
वीजवाहिन्यांवर
वेलींचा विळका
सातारा : सातारा शहर व परिसरातील अनेक वीज खांबांना वेलींनी विळखा घातला आहे. वीजवाहिन्यांवर वेलींचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील मल्हारपेठ, राधिका रोड, बुधवार नाका, केसरकर पेठ आदी ठिकाणचे विद्युत खांब वेलींनी आच्छादलेले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरण विभागाने खांबांवर वाढलेल्या वेली व झाडेझुडपे हटवावित, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून केली जात आहे.
दुकानातील कचरा
साचतोय रस्त्यावर
सातारा : पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. मात्र या अभियानाला खोडा घालण्याचे काम शहरातील व्यापारी व दुकानदारांकडून सुरू आहे. दुकानात साचलेला कचरा दुकानदारांकडून घंटागाडीऐवजी रस्त्यावर फेकला जात आहे. हा कचरा स्वतःच्या कचराकुंडीत साठवून ठेवण्याची तसदीही अनेक दुकानदार घेताना दिसत नाहीत. अशा दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
लॉकडाऊनचा
स्ट्रॉबेरीला फटका
महाबळेश्वर : स्ट्रॉबेरी लॅण्ड म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीलाही संचारबंदीचा फटका बसला आहे. स्ट्रॉबेरीचा हंगाम ऐन बहरात असताना संचारबंदी लागू झाली अन् महाबळेश्वर पाचगणी या पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची पावले थांबली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची स्ट्रॉबेरी शेतातच पडून आहे. गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला तर अनेकांचे संचारबंदीमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.