महामार्गावर दारु पिऊन वाहनचालक तर्राट; कोरोनामुळे कारवाईला येतोय अडथळा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:11+5:302021-07-02T04:27:11+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या काळात मद्यपी वाहनचालकांवरील कारवाया थंडावल्या आहेत. याचे कारण म्हणजे सर्वच वाहनचालकांनी मास्क वापरल्याने ब्रीथ ॲनालायझरचा ...
सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या काळात मद्यपी वाहनचालकांवरील कारवाया थंडावल्या आहेत. याचे कारण म्हणजे सर्वच वाहनचालकांनी मास्क वापरल्याने ब्रीथ ॲनालायझरचा वापर पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे या काळात फारशा कारवाया झाल्याच नाहीत.
मद्यपी वाहनचालकांमुळे अनेकदा भीषण अपघात होत असतात. विशेषत: या घटना महामार्गावर घडतात. त्यामुळे पोलिसांकडून मद्यपी चालकाची ब्रीथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली जाते. यामध्ये अनेक वाहनचालकांनी मद्यपान केल्याचे आढळून येते. कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी अशाप्रकारच्या कारवाया महामार्ग पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून केल्या जात होत्या. मात्र, लाॅकडाऊननंतर या कारवाया पूर्णपणे बंद झाल्या. नागरिकांना ताेंडाला मास्क सक्तीचे करण्यात आले. त्यामुळे ॲनालायझर मशीन असूनसुद्धा पोलिसांना काही करता आले नाही. फार फार तर गाडी अडवल्यानंतर जर चालकाच्या बोलण्यातून त्याने मद्यपान केलंय हे जाणवले तर पोलीस त्याच्यावर दंडात्मक कारवाई करत होते. अगदीच एखादा अपघात झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच चालकाने मद्यपान केल्याचे समोर येत होते.
ब्रीथ ॲनालायझरचा वापर बंद...
कोरोना काळात सर्व वाहनचालकांना मास्क सक्तीचे करण्यात आले होते. त्यामुळे या ब्रीथ ॲनालायझर मशीनचा वापर बंद करण्यात आला. त्यामुळे मद्यपी चालकांचे चांगलेच फावले. मद्यपान केल्याने अनेक वाहनचालकांकडून या काळात अपघात झाले आहेत.
कोरानाच्या काळात महामार्गावर रहदारी कमी होती. दिवसभर पोलीस वाहनचालक व गाडीतील प्रवाशांच्या तोंडाला मास्क आहे का, हे पाहात होते. त्यामुळे फारशा कारवाया करता आल्या नाहीत. तसेच ब्रिथ ॲनालायझर मशीनचा वापरही बंद होता. त्यामुळे मद्यपी चालक कोण आहे, हे समजून येत नव्हते. मात्र, तरीसुद्धा पोलिसांनी अनेक मद्यपींवर कारवाई केली आहे.
- सजन हंकारे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका
२०२१मध्ये मद्दपी वाहनचालकांवर झालेली कारवाई (जूनपर्यंत)
जानेवारी १८९
फेब्रुवारी ८३
मार्च २८
एप्रिल १९
मे १६
जून २१