घशाला कोरड अन् मृगजळाची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:49 PM2018-04-29T23:49:22+5:302018-04-29T23:49:22+5:30

Dry and damp mite in the grass | घशाला कोरड अन् मृगजळाची भुरळ

घशाला कोरड अन् मृगजळाची भुरळ

Next

सागर गुजर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्याला उन्हाच्या झळांनी हैराण केले आहे. त्यातच आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जमिनीतील उपलब्ध पाणीही मोठ्या प्रमाणावर शोषून घेतले जात आहे. या परिस्थितीत दुष्काळावर मात करण्याऐवजी जिल्हा प्रशासन मात्र पाणी साठल्याचा गाजावाजा करत दुष्काळ लपवायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. ‘घशाला कोरड अन् मृगजळाची भुरळ,’ अशी जणू ही परिस्थिती आहे.
संपूर्ण एप्रिल महिन्यात उन्हाळ्याने भलतेच हैराण केले. आता मे महिन्याच्या तोंडावर पोहोचल्यानंतर पुढे काय होईल, याची धास्ती सर्वांनाच लागून राहिली आहे. अनेक गावे टंचाईग्रस्त झाली आहे. पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ दुष्काळी जनतेवर आली आहे. केवळ माण, खटावमध्येच नव्हे तर फलटण, कोरेगाव, खंडाळा इतकंच काय तर पावसाचे आगर असणाºया वाई, महाबळेश्वर आणि जावळी या तालुक्यांतही पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. उन्हाळ्यामुळे पिकांना पाणी जास्त लागते तसेच जनावरांना जगवितानाही शेतकºयांची त्रेधा उडताना पाहायला मिळत आहे. बोअरवेल, विहिरींनी तळ गाठला आहे. शेततळी कोरडी पडू लागली आहेत.
या परिस्थितीत प्रशासन केवळ आकडेवारी करत दुष्काळग्रस्तांच्या जखमांवर मीठ फिरविताना दिसत आहे. टँकर मागणीचे प्रस्ताव येत असतानाही प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे.
पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू...
कलेढोण परिसरातील लोक पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.
चार ते पाच दिवसांत टँकर सुरू न केल्यास तहसीलदार
कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला
आहे. गारुडी, हिवरवाडी, ढोकळवाडी, अनफळ, कान्हरवाडी, पाचवड, औतरवाडी, विखळे गावांतील लोकांची पिण्याचे पाण्यासाठी टँकर
सुरू करावी, अशी मागणी गेल्या फेब्रुवारीपासून सुरू आहे. पंचायत
समिती सदस्या मेघाताई पुकळे यांनी गटविकास अधिकारी तसेच
तहसीलदार, प्रांताधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून पत्र देऊन टँकरची मागणी केली. त्यासाठी पाठपुरावाही केला; परंतु तरीही एकाही गावात टँकर सुरू नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू आहे.
बोअरचे पाणी आटले; टॅँकरच्या मंजुरीला मिळेना मुहूर्त...
अनफळे, ता. खटाव येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू असून, पाण्याचा एकमेव आधार असलेल्या बोअरवेलचे पाणीसुद्धा दोन महिन्यांपूर्वी आटले आहे. सध्या येथील खंडोबा मंदिरालगत असलेल्या बोअरवेलमधून सकाळी अर्धा तासच पाणी ग्रामस्थांना मिळत असून, एका कुटुंबाला केवळ चार ते पाच घागरी पाणी मिळत आहे. ग्रामपंचायतीने गेल्या दीड महिन्यापूर्वी शासन दरबारी टँकरची मागणी केली असून, अद्यापही टँकर मंजुरीला मुहूर्त मिळाला नाही.
प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे संताप
खटाव-माणमधील अनेक गावे तहानेने व्याकूळ असताना प्रशासन मात्र वेळकाढूपणा करीत आहे. टंचाई जाहीर झाली नसल्याचे तुणतुणे वाजवणारे अधिकारी आता टंचाईच्या प्रस्तावात त्रुटी काढून टँकर सुरू करण्यास चालढकल करीत आहेत. असंवेदनशील प्रशासनाविरुद्ध नागरिकांतून संताप व्यक्त केला जात असून, जीव गेल्यावर टँकर सुरू करणार का? असा संतप्त सवाल केला जात आहे. यंदा खटाव व माणमधील सुमारे ७० ते ८० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संबंधित गावांनी टँकर सुरू होण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केलेत. मात्र, दोन महिन्यांपासून ते शासन दरबारी धूळखात पडलेत.

Web Title: Dry and damp mite in the grass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.