गळती लागल्याने बामणवाडी पाझर तलाव कोरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:36 AM2021-04-26T04:36:28+5:302021-04-26T04:36:28+5:30
बामणवाडी येथील पाझर तलाव १९८०-८१ मध्ये बांधण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी तलाव झाल्यास पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल या ...
बामणवाडी येथील पाझर तलाव १९८०-८१ मध्ये बांधण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी तलाव झाल्यास पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल या आशेने जमिनी विनामोबदला दिल्या. तेव्हापासून तलावास गळती असल्याने पाणी साठा जास्त काळ टिकून राहिला नाही. तलावाची गळती काढण्यात यावी म्हणून स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे मागणी केली. मात्र, गळती काढण्यास निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते.
लघु पाटबंधारे विभागाने १५ मार्च २००१ ला तलाव दुरुस्ती कामी मंजुरी दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या नावे ६५ हजार रुपयांची निविदा काढली. मात्र, ग्रामपंचायतीस कोणतीही माहिती न देता दुसऱ्या ठेकेदाराला काम दिले. या ठेकेदाराने शासनाचे नियम बासनात गुंडाळून चार दिवसांत काम पूर्ण केले. गळती काढल्यानंतर पहिल्यापेक्षा दुप्पट गळती वाढली. ती कायम तशीच राहिली.
जलयुक्त शिवार योजनेत २०१९ मध्ये बामणवाडी समाविष्ट केल्यानंतर एप्रिल- मेमध्ये पुन्हा या तलावाची गळती काढण्यात आली. यावेळी नवीन तंत्रज्ञान वापरून प्लास्टिक कागदाचा वापर करण्यात आला. यावेळी तलावाच्या भिंतीच्या आतील बाजूस चर खोदून हा पेपर टाकण्यात आला. यावेळी संबंधित ठेकेदाराकडून फाटका पेपर टाकण्यात आला. यावेळी संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी फाटका पेपर असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी पेपर चिकटवला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
गळती काढण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. तलाव पूर्ण क्षमतेने भरला गेला. यावेळी तलावात पाणी साठा टिकून राहील या आशेने शेतकरी समाधानी झाला होता. मात्र, जास्त वेळ समाधान टिकून राहिले नाही. तलाव पूर्ण क्षमतेने भरला तरीही नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात संपूर्ण पाणी साठा संपुष्टात येत आहे.
चौकट :
तलावाची गळती व गाळ काढल्यास बारमाही पाणी साठा टिकून राहू शकतो. पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने या तलावाची रचना असल्याने विद्युत मोटारीशिवाय पाइपलाइन, पाटाद्वारे काही क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. या पाणी साठ्यामुळे परिसरातील विहिरींना पाणी स्रोत वाढून उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईपासून मुक्ती मिळू शकते.