कोरडा रंग चेहऱ्यासाठी.. पिचकारी झाडांसाठी !

By admin | Published: March 28, 2016 11:38 PM2016-03-28T23:38:13+5:302016-03-29T00:16:44+5:30

साताऱ्यात ऐतिहासिक रंगपंचमी : ‘लोकमत’च्या आवाहनास भरभरून प्रतिसाद; बच्चे कंपनीलाही उमजले थेंब-थेंब पाण्याचे महत्त्व

For dry color face .. for tender plants! | कोरडा रंग चेहऱ्यासाठी.. पिचकारी झाडांसाठी !

कोरडा रंग चेहऱ्यासाठी.. पिचकारी झाडांसाठी !

Next

सातारा : राज्यासह जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने उन्हाळ्याच्या तोंडावरच अनेक ठिकाणी पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा दुुष्काळाशी चार हात करत असताना रंगपंचमीत होणारा पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘रंगोत्सव पाण्याच्या नासाडीविना’ या चळवळीस सातारकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात सहभागी होत सातारकरांनी यंदाची रंगपंचमी कोरड्या रंगांचा वापर करून साजरी केली.
पाण्याविना रंगपंचमी साजरी होऊच शकत नाही, अशी अनेकांची मानसिकता झाली आहे. या मानसिकतेमुळे रंगपंचमीत दरवर्षी लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होतो. तरुणाई देखील पाण्यासह पैशांचा अपव्यय करून डॉल्बी सिस्टीमवर बेभान होऊन नाचताना दिसते. मात्र, यंदाच्या रंगपंचमीत अबालवृद्धांनी या सर्व गोष्टींना बगल देत पाण्याविना रंगपंचमी साजरी केली.
सातारकरांनी पाण्याचा वापर न करता केवळ कोरड्या तसेच नैसर्गिक रंगांचा वापर केला. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन इतरांना पाण्याचा वापर न करण्याचे आवाहनही केले. डीजेच्या ठेक्यावर बेभान होऊन नाचणाऱ्या तरुणाईने पाण्याचे महत्त्व ओळखून कोरड्या रंगांनी रंगपंचमी खेळली. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय व ग्रामपंचायतींनी ‘लोकमत’च्या आवाहनास प्रतिसाद देत कोरडी रंगपंचमी खेळण्याची व पाणी बचतीची थपथ घेतली होती. त्यानुसार अनेकांनी आपली जलप्रतिज्ञा पूर्ण केली.
‘लोकमत’ने केलेल्या या आवाहनामुळे यंदा जिल्ह्यात लाखो लिटर पाण्याची बचत झाली असून, दुष्काळी परिस्थितीत ‘लोकमत’ने केलेले हे कार्य ऐतिहासिक व कौतुकास्पद आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

निसर्गासंगे रंगपंचमी
लहान मुले देखील एका छोट्या कृतीतून मोठी शिकवण देऊन जातात याची प्रचिती साताऱ्यात रंगपंचमीदिवशी अनुभवता आली. येथील काही मुलांनी कोरड्या रंगांनी रंगपंचमी खेळली. तसेच पिचकारीमधून एकमेंकांच्या अंगावर रंग न उडविता चिमुकल्यांनी चक्क घराशेजारी असलेल्या वृक्षांना पाणी घातले. पाण्याविना वृक्षसंपदा धोक्यात आली असताना लहानग्यांनी दाखविलेल्या आपल्या कल्पनाशक्तीचे सर्वांनीच कौतुक केले.


‘लोकमत’ने संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाणीबचतीचा संदेश दिला. या मोहिमेस प्रतिसाद देत मायणीतील नागरिकांनी सार्वजनिक रंगपंचमीला पूर्णविराम दिला.
- डॉ. एम. आर. देशमुख
संस्थापक, शिवाजी एज्युकेशन सोसायटी


सार्वजनिक मंडळांकडूनही जनजागृती..
‘लोकमत’च्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा शहरातील जयहिंद व जय जवान या मंडळांनी ढोल-ताशे वाजवून कोरडी रंगपंचमी साजरी केली. तसेच ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनानुसार नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती केली.

Web Title: For dry color face .. for tender plants!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.