फलटणमधील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:39 AM2021-05-26T04:39:13+5:302021-05-26T04:39:13+5:30
जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांपैकी एक म्हणजे, तीव्र लॉकडाऊनच्या संकल्पनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २५ मेपासून ...
जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांपैकी एक म्हणजे, तीव्र लॉकडाऊनच्या संकल्पनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २५ मेपासून ३१ मे या कालावधीत तीव्र लॉकडाऊनचा आदेश जारी केला होता. त्याची पोलीस आणि प्रशासनातर्फे कडक अंमलबजावणी करण्यात आली. औषध दुकाने वगळता सर्व दुकाने १०० टक्के बंद होती. रस्त्यांवर तुरळक माणसे आणि वाहने दिसत होती. तरीपण ती खरोखर अत्यावश्यक कामांसाठी बाहेर फिरत होती का, याची तपासणी पोलीस आणि नगरपालिकेचे सर्व कर्मचारी करीत होते. शहरात येणाऱ्या सर्व चेक पॉईंटवर पोलीस आणि नगरपालिकेचे कर्मचारी थांबून होते. फलटण तालुक्यात वाढती रुग्णसंख्या पाहता आणि रोज विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या पाहता येथे कडक लॉकडाऊन गरजेचे होते. त्याप्रमाणे प्रशासन आणि पोलिसांनी त्याची चांगली अंमलबजावणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लॉकडाऊनची अंमलबजावणी अतिशय कडक पद्धतीने करावयाची असल्याने रस्त्यांवर भाजी, फळे विक्रेते दिसणार नाहीत. दुकाने उघडी दिसणार नाहीत, याची काळजी प्रशासनातर्फे घेण्यात आली.
फोटो
२५फलटण-लॉकडाऊन
फलटण येथील नेहमी गजबजणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मंगळवारी निर्मनुष्य झाला होता. (छाया : नसीर शिकलगार)