जनावरांनाही बसतोय दुष्काळी चटका!

By Admin | Published: February 2, 2016 01:02 AM2016-02-02T01:02:05+5:302016-02-02T01:02:05+5:30

उन्हामुळे गवत करपले : चारा छावण्या सुरू करा; माण-खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी

Duck! | जनावरांनाही बसतोय दुष्काळी चटका!

जनावरांनाही बसतोय दुष्काळी चटका!

googlenewsNext

पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डी, जाशी सह परिसरात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. सप्टेंबर महिन्यांत झालेल्या पावसानंतर पुन्हा पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरिपाचा हंगामही वाया गेला. जनावरांसाठी चाराही नाही. अपुऱ्या पावसामुळे ज्वारीची वाढच झाली नसल्याने अपुरे वाढलेले ज्वारीचे बाटुक किती दिवस पुरणार, असा प्रश्न आता पशुपालकांसमोर उभा आहे.
माण व खटाव तालुका परिसरात सकाळ, संध्याकाळ ऊसवाड्याच्या गाड्या फिरू लागल्या आहेत. अव्वाच्या सव्वा दराने ऊस विकला जात आहे; पण तेही घेणं आता सर्वसामान्यांना परवडत नाही. सहा रुपयांना एक पेंडी विकली जात असली, तरी त्यामध्ये सात ते आठच वाडे असतात. त्यामुळे रोजचा शंभर ते दीडशे रुपये एका जनावराला खर्च करणे सामान्य पशुपालकाच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
परिसरातील शेळ्या-मेंढ्यापालकही मेटाकुटीला आले आहेत. पावसाअभावी दिवसेंदिवस माळरानही ओसाड, भकास दिसत आहेत. गवताच्या वाळून गेलेल्या काड्या कुरतडत माळावर जनावरे चाऱ्यासाठी फिरत आहेत. उन्हाच्या झळा बसू लागल्याने या भागात पाणी टंचाईचे संकट मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहे.
उन्हाळ्यात येणाऱ्या भयाण परिस्थितीला तोंड देण्याऐवजी आत्ताच जनावरे विकली, तर किमान ती शेतकऱ्यांच्या दावणीला तरी जातील. या भाबड्या समजुतीने जनावरांचे हाल पाहावत नसल्याने पशुपालक जनावरांना मिळेल त्या किमतीला बाजारात विकत आहे. चारा नसल्याने ज्या शेतकऱ्यांकडे तीन-चार जनावरे होती तेथे आता फक्त एखादेच जनावर दिसत आहे. (वार्ताहर)
एका पेंडीला आठ रुपये
माण तालुक्यात दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा बिकट बनला आहे. उन्हामुळे माळरानावर गवतही राहिले नाही. शेतकरी जनावरांसाठी उसाचे वाडे विकत घेत आहेत. मात्र, वाड्याच्या एका पेंडीला सात ते आठ रुपये मोजावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना एका जनावरासाठी दिवसाकाठी शंभर ते दीडशे रुपये खर्च येत असून तो परवडणारा नाही. चारा छावणी सुरू करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Duck!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.