वय झाल्यामुळेच विरोधक बेताल!
By admin | Published: June 18, 2015 10:16 PM2015-06-18T22:16:08+5:302015-06-19T00:19:29+5:30
अविनाश मोहितेंची बिनधास्त मुलाखत : मी श्रद्धाळू आहे; पण अंधश्रद्धाळू नाही.. विरोधकांनी माझ्या खुर्चीखाली वाकून पाहावे ! --लोकमत सडेतोड
कऱ्हाड : विरोधक माझ्यावर करीत असलेले बेताल आरोप हा त्यांच्या वाढलेल्या वयोमानाचा परिणाम असून, गेल्या पाच वर्षांत मी केलेल्या कामावर कारखान्याचे सभासद समाधानी आहेत. ऊस उत्पादकांच्या आणि कारखान्याशी संबंधित प्रत्येक घटकाच्या विकासासाठी सुरू केलेले उपक्रम कायम ठेवण्याच्या दृष्टीने पुढील पाच वर्षांसाठी सभासद मलाच पुन्हा संधी देणार हे स्पष्ट झाल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, अशी बिनधास्त टिप्पणी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी केली.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांची आतषबाजी सुरू असतानाच गेल्या निवडणुकीत प्रस्थापितांना धूळ चारून कारखान्याची सत्ता हस्तगत करणारे अविनाश मोहिते यांची मते ‘लोकमत टीम’ने जाणून घेतली. विरोधकांच्या आरोपांमध्ये दम नसल्याने आपण दुसऱ्यांदा विजयी पताका फडकविणार, याची खात्री मोहिते यांनी व्यक्त केली. सत्ता मिळविल्यापासून कारखान्याच्या आणि सभासदांच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांची जंत्री त्यांनी सादर केली. ‘मी सभासद शेतकऱ्यांना सोळा तास वीज आणि सिंंचन सुविधा दिली. आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या. कामगारांना उच्चांकी बोनस आणि पगारवाढ दिली. मद्यार्कनिर्मितीचा नफा २६ कोटींवर पोहोचविला. कृषी महाविद्यालय सुरू करून सभासदांच्या मुलांना त्यात प्राधान्याने प्रवेश दिला. एक रुपयाही डोनेशन घेतले नाही. दरमहा पाच किलो साखर दोन रुपये दराने दिली. राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन प्रथमच भरविले,’ अशा शब्दांत त्यांनी पाच वर्षांतील आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला.
गेल्या पाच वर्षांत कृष्णा कारखाना कर्जाच्या खाईत लोटल्याचा आरोप दोन्ही विरोधक अविनाश मोहिते यांच्यावर करीत असून, कारखान्याची अवस्था सांगलीच्या वसंतदादा पाटील साखर कारखान्यापेक्षाही बिकट असल्याचे प्रचारात सांगितले जात आहे. याविषयी मोहिते म्हणाले, ‘विरोधकांनी अहवाल घेऊन बसावे. आकडे पाहावेत. आम्ही सत्तेच्या पहिल्याच वर्षी को-जनरेशन प्रकल्प सुरू केला. लवकरच तो कर्जमुक्तही होईल. प्रकल्पासाठी सभासदांच्या ठेवी भांडवली वर्ग केल्याचा प्रचारही खोटा असून, ३३ कोटींच्या ठेवी शिल्लक आहेत. कारखान्यावरील एकंदर कर्ज वाढले हा अपप्रचार आहे.’ यावेळी तिरंगी लढत होत असताना आपल्या संस्थापक पॅनेलसोबत किती जण राहतील, असा प्रश्न केला असता ते म्हणाले, ‘गेल्या निवडणुकीपेक्षा मोठा पाठिंंबा मला आहे. वाळवा तालुक्यातील काँग्रेसची मंडळी माझ्यासोबत आहेत. अनेकांनी अर्ज मागे घेतल्यानंतर नाव न सांगण्याच्या अटीवर मला पाठिंंबा दिला आहे.’ (लोकमत चमू)
ऊसदराची आकडेमोड कराच
यंदा ऊस उत्पादकांना केवळ १९०० रुपये दर दिल्याच्या मुद्द्यावर अविनाश मोहिते म्हणाले, ‘दहा लाख साखरपोती शिल्लक असल्याने यंदाही किमान २१०० रुपये दर शेतकऱ्यांना मिळणारच. विरोधकांनी पूर्वीपासून ऊसदराची आकडेमोड करून पाहावी. ‘कृष्णा’चे दर राजारामबापू पाटील कारखान्याच्या तुलनेत पाहण्याची परंपरा आहे. १९९४ ते ९९ या मदनराव मोहितेंच्या काळात ‘राजारामबापू’च्या तुलनेत ‘कृष्णा’चा दर १९५ रुपयांनी कमी होता. २०००-२००५ या सुरेश भोसलेंच्या काळात तो ४२६ रुपयांनी कमी होता. २००५-२०१० या इंद्रजित मोहितेंच्या काळात तो ३६० रुपयांनी कमी होता, तर माझ्या कारकीर्दीत २०१०-२०१५ दरम्यान तो केवळ ७० रुपयांनी कमी होता.’
संस्थेपेक्षा कोणी मोठे नाही
संस्थेपेक्षा कोणीही मोठे नाही, हे तत्त्व गेल्या पाच वर्षांत कारखान्याचा कारभार करताना आपण पाळले असल्याचे अविनाश मोहिते यांनी नमूद केले आणि २५ कामगारांना काढून टाकण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. या कामगारांना त्यांच्या चुकांमुळेच घरी जावे लागले, अशी पुस्तीही जोडली. परंतु विरोधक मात्र ३५५ कामगारांना कमी केल्याची टीका करीत आहेत, हे निदर्शनास आणून दिल्यानंतर ‘हा तद्दन अपप्रचार आहे,’ असे त्यांनी सांगितले. किती कामगारांना कमी केले आणि का केले, याचे पुरावे आपण सादर करणार असल्याचे सांगतानाच १३ हजार ५२८ सभासदांना न्याय दिल्याचा दावाही त्यांनी केला.
रेठऱ्याचे मासे जिवंत कसे?
यावर्षी कृष्णा नदीतील मासे मरण्यास कारखान्याने केलेले प्रदूषण जबाबदार असल्याचा ठपका प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठेवला आहे. कारखान्याची अनामत रक्कम जप्त केली आहे. तथापि, हाही अपप्रचार असल्याचा दावा अविनाश मोहिते यांनी केला. ‘कारखाना रेठरे बुद्रुकमध्ये आहे. मासे मेले बोरगावातले. रेठऱ्यापासून बोरगावापर्यंत नदीवर दोन ठिकाणी बंधारे आहेत. कारखान्यातील प्रदूषके सोडल्यामुळे मासे मरायचेच असते, तर आधी रेठऱ्यातील मासे मेले असते. या प्रश्नात कारखान्याचा काहीच दोष नाही हे निष्पन्न झाले आहे.’ दरम्यान, ‘कृष्णा’ आणि ‘किसन वीर’ कारखान्यांच्या निवडणुका लागल्या आणि नेमक्या याच दोन कारखान्यांना प्रदूषणाबाबत नोटिसा आल्या. याच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील मासे मृत्युमुखी पडले. यामागे राजकीय षड््यंत्र असल्याचे आपल्याला म्हणायचे आहे का, या प्रश्नावर मात्र अविनाश मोहिते यांनी मौन राखले.
का नाराज झाले विलासकाका?
विधानसभा निवडणुकीत विलासकाका उंडाळकर आणि अविनाश मोहिते एकत्र होते. आज काका डॉ. सुरेश भोसले यांच्यासोबत आहेत. यामागील कारण विचारले असता मोहिते म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत रेठरे परिसरात अतुल भोसले यांना चांगली मते मिळाली. त्यामुळे काका भोसले यांच्यासोबत असावेत.’ अविनाश मोहितेंना ‘पाहिले नसल्याचे’ आणि ‘भेटीगाठी झाल्या नसल्याचे’ सुरेश भोसले यांनी सांगितले होते. याविषयी विचारले असता ‘मीही भोसलेंना पाहिले नाही आणि भेटलो नाही. आमच्या रेठऱ्याची लोकसंख्या ८ हजार ६०० आहे. त्यामुळे आमच्याही भेटीगाठी झालेल्या नाहीत.’
सत्ताबाह्य केंद्र : कुणाचे ऐकावे हा वैयक्तिक प्रश्न
आपल्या कार्यकाळात कारखान्यात ‘सत्ताबाह्य केंद्र’ कार्यरत होते, या विरोधकांच्या आरोपाचा समाचार घेताना मोहिते म्हणाले, ‘मी कुणाचे ऐकावे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. विरोधकांनी मुद्दे सोडून बोलू नये.’ कारखान्यात आपल्या खुर्चीखाली नारळ आणि गाठोडे ठेवल्याचा आरोप करून विरोधक आपल्याला अंधश्रद्धाळू म्हणतात, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘वयपरत्वे विरोधक अपप्रचार करीत आहेत. मी श्रद्धाळू आहे; पण अंधश्रद्धाळू नाही. माझ्या केबीनमध्ये फक्त गगनगिरी महाराजांचा फोटो आहे. खातरजमा करायची असेल तर विरोधकांनी माझ्या खुर्चीखाली वाकून पाहावे.’