पावसाने ओढ दिल्याने... बळीराजाची चिंता वाढली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:24 AM2021-07-19T04:24:57+5:302021-07-19T04:24:57+5:30
जगन्नाथ कुंभार लोकमत न्यूज नेटवर्क मसूर : मसूर परिसरात पावसाने दडी मारली असली तरी पडलेल्या तुरळक सरींमुळे पेरणी व ...
जगन्नाथ कुंभार
लोकमत न्यूज नेटवर्क
मसूर : मसूर परिसरात पावसाने दडी मारली असली तरी पडलेल्या तुरळक सरींमुळे पेरणी व टोकणी केलेली पिके कशीबशी तग धरुन आहेत. परंतु, या भागात मोठ्या पावसाची गरज आहे. येत्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही तर शेतकऱ्यांची चिंता वाढेल. सद्यस्थितीत धरणामध्ये पाण्याचा पुरेसा साठा असल्याने कऱ्हाड तालुक्यातील आरफळ कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. परंतु, याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.
जून महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर संपूर्ण कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी व टोकणीची कामे तसेच आडसाली ऊस लागणीची कामे पूर्ण केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे ओढ दिली आहे. जून महिन्यात झालेल्या दमदार पावसानंतर आडसाली लागण केलेल्या ऊसाची उगवण चांगल्या पद्धतीने झाली आहे. तसेच टोकणी व पेरणी केलेल्या सोयाबीन, भुईमूग, घेवडा, चवळी, मूग, मका आदी पिकांची उगवणही चांगल्याप्रकारे झाली आहे. त्यामुळे आभाळाकडे बघत शेतकरी पिकांची भांगलण, कोळपणी अशी आंतरमशागतीची कामे करत आहेत. मात्र, पावसाने ओढ दिल्याने आडसाली ऊसासह घेवडा, सोयाबीन, भुईमूग आदीसह सरीवर टोकणी केलेली पिके दुपार धरू लागली आहेत. याचा परिणाम ऊसासह सर्व पिकांच्या उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
साधारणपणे रोहिणी नक्षत्रात रोपांच्या भात लागणीसाठी रोपे तयार करण्यासाठी शेतात बी टाकलेले असते. कऱ्हाड तालुक्याच्या काही भागात भातपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पेरणीऐवजी रोपांची लागण केलेल्या भाताचे उत्पादन चांगले मिळत असल्याने शेतकरी भाताच्या रोपांची लागण करतात. साधारणपणे जून अखेरपर्यंत भाताच्या रोपांच्या लागणीला सुरुवात होते. मात्र, पावसाने ओढ दिल्याने भाताच्या रोपांची लागण रखडली होती. आता पाऊस पडेल, या आशेवर लावणी केली जात आहे.
कोट.....
गेल्या काही दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. उन्हाळ्यासारखे रखरखीत कडक ऊन पडत आहे. त्याचा विपरीत परिणाम उभ्या पिकावर होत आहे. रुसलेला वरुणराजा वेळीच प्रसन्न होऊन बरसला नाही तर संकटाला सामोरे जावे लागेल. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होईल.
- सतीश कांबिरे, कांबिरवाडी.
फोटो १८मसूर-अॅग्री
माळवाडी येथील शेतात सायकल कोळप्याच्या सहाय्याने शेतकरी कोळपणी करत आहेत. (छाया : जगन्नाथ कुंभार)