गद्दारीच्या पार्श्वभूमीवर पक्षनिष्ठेला उधाण !
By admin | Published: January 18, 2017 12:13 AM2017-01-18T00:13:27+5:302017-01-18T00:13:27+5:30
गर्दी ओसंडली : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी भवन गजबजले
सातारा : ‘सांगलीकरांकडून प्रसाद घेणाऱ्या गद्दारांना बाजूला सारा,’ असा सज्जड दम राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यानी दिल्यानंतर ‘आपण किती पक्षनिष्ठ आहोत!’ हे दाखविण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांकडून नानाविध क्लृप्त्या लढविल्या जात असल्याचे चित्र मंगळवारी राष्ट्रवादी भवनमध्ये दिसून आले.
केंद्र व राज्यातील सत्तेचा वाटा संपुष्टात येऊनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणाऱ्यांची रिघ कमी झालेली नाही. सोमवारपासून राष्ट्रवादी भवनात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सुरू आहे. सत्ता नसली तरीही राष्ट्रवादीकडे कार्यकर्त्यांचा ओढा कायम असल्याचे चित्र या निमित्ताने पुढे आले आहे.
सोमवारी वाई, महाबळेश्वर, खंडाळा व फलटण या चार तालुक्यांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तर मंगळवारी माण, खटाव, कोरेगाव, जावळी या तालुक्यांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. केंद्रात व राज्यात सत्ता आल्यानंतर आपसूकच साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनाबाहेर पूर्वी असणारी लोकांची रिघ कमी झाली होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राष्ट्रवादी भवनाच्या बाहेरच्या मुख्य रस्त्यावर वाहनांची रांग लागलेली पाहायला मिळते. प्रशासकीय इमारतीच्या बाजूनेही मोठ्या संख्येने चारचाकी वाहने लावली गेली आहेत. जिल्हा पोलिस परेड ग्राऊंडच्या प्रवेशद्वारापर्यंत या वाहनांची रांग लागलेली आहे.
सोमवारी राष्ट्रवादी भवनात २११ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मंगळवारी कोरेगाव, माण, खटाव, जावळी या तालुक्यांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती घेत असताना स्थानिक आमदार उपस्थित होते. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गे, पक्षनिरीक्षक सुरेशराव घुले ही मंडळी उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. (प्रतिनिधी)
गायत्रीदेवींच्या उपस्थितीत खटावकरांच्या मुलाखती
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी मंगळवारी खटाव तालुक्यातील मुलाखती सुरू असताना हजेरी लावली होती.
गळ्यात राष्ट्रवादीचा पट्टा
मुलाखत देताना ‘प्रॉपर’ तयारी केलेली मंडळी ‘इथिक्स’ चा विषय गांभीर्याने घेत असल्याचे पाहायला मिळत होते. मुलाखतीसाठी नेत्यांसमोर बसताना राष्ट्रवादीचा कापडी पट्टा गळ्यात घालूनच एक उमेदवार गेला होता. पक्षनिष्ठा दाखविण्यासाठी अनेकांनी अशा क्लृप्त्या केल्या.
आधी पोटोबा मग मुलाखती
मुलाखतीची वेळ दुपारनंतर असणाऱ्यांनी प्रथम पोट भरण्यासाठी राष्ट्रवादी भवनाशेजारचे हॉटेल गाठले. आधी पोटोबा केल्यानंतर मगच मुलाखत असे धोरण त्यांनी अवलंबलेले पाहायला मिळाले.
आत काय विचारतात ?
राष्ट्रवादी भवनाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. मात्र, या सभागृहाचे दार बंद ठेवण्यात आले असल्याने अनेकजण घाम पुसतच दरवाजाच्या बाहेर आपला नंबर येण्याची वाट पाहत होते. राष्ट्रवादीचे माजी सरचिटणीस सुधीर धुमाळ, विद्यार्थी राष्ट्रवादी काँगे्रसचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब महामुलकर यांच्याकडून ही मंडळी सल्ला घेत होती.
जिल्हाध्यक्षांच्या केबीनमध्ये महिलांची गर्दी
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या केबीनमध्ये एरव्ही महिला पदाधिकाऱ्यांची गर्दी असते; पण निवडणुकीच्या मुलाखतींच्या निमित्ताने पक्षातील सामान्य गृहिणीदेखील थेट अध्यक्षांच्या केबीनमध्ये जाऊ शकल्या. या केबीनमध्ये महिलांची भलतीच गर्दी होती.