मंत्र्यांच्या बुस्टर डोसमुळे हवेतील बांधकाम विभाग रस्त्यावर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:40 AM2021-07-30T04:40:17+5:302021-07-30T04:40:17+5:30
ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील जनतेच्या मूलभूत सुविधांसह दळणवळण पूर्ववत करण्यासाठी ७२ तासांची मुदत राज्याचे गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्याने ...
ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील जनतेच्या मूलभूत सुविधांसह दळणवळण पूर्ववत करण्यासाठी ७२ तासांची मुदत राज्याचे गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्याने बांधकाम विभागाची झोपच उडाली आहे. नेहमीच हवेत असणाऱ्या या विभागाची यंत्रणा मंत्र्यांच्या बुस्टर डोसमुळे रस्त्यावर उतरली असून, तुटलेले रस्ते-पूल दुरुस्तीसाठी त्यांची धांदल उडाली आहे. दरम्यान, कामांमध्ये जाणूनबुजून केलेल्या चुकांचा निसर्गानेच पंचनामा केल्याने अनेक अधिकारी आता त्या चुका कशाबशा झाकण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे.
भूकंपाची नेहमीच टांगती तलवार असलेल्या पाटण तालुक्याला नैसर्गिक आपत्तींनी घेरले आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ, कधी वादळाचा तडाखा तर कधी पुराचा धोका अशा आपत्तींच्या जाळ्यात अडकलेल्या या तालुक्यातील जनता पुरती मेटाकुटीला आली आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रच डोंगररांगांमध्ये विस्तारल्याने विकासकामांवर मर्यादा येत आहेत. तरीही या तालुक्यात वस्ती तेथे रस्ता पोहोचविण्याची किमया येथील नेतेमंडळींनी यशस्वी केली.
मात्र, रस्त्यांची आणि ओढ्यांवर बांधलेल्या साकव पुलांची मोठ्या प्रमाणात कामे झाली असली तरी तेवढ्याच प्रमाणात बांधकाम विभागाकडून या कामांमध्ये पाणी मुरल्याचे निसर्गाने दाखवून दिले. बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांच्या दिलजमाईतून निकृष्ट झालेल्या कामांचा पोलखोलच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झाला. ढेबेवाडी विभागात तर अनेक ओढ्यांवरील जुने साकव सुस्थितीत असल्याचे दिसून येत असून, नवीन बांधकामांची मात्र दैना झाली आहे. वाल्मीक पठारावरील बहुतेक रस्तेच गायब झाल्याने भूस्खलन झाल्याने अडचणीत सापडलेल्या गावांतील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात मोठी कसरत करावी लागत आहे. या गावांच्या रस्ता आणि पुलांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च झाला तरीही ही गावे अजूनही दळणवळणापासून दूर का? एवढा मोठा निधी कुठे मुरला? अंदाजपत्रक करताना बांधकाम विभागाने कसे केले? हे सर्व गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होत आहेत.
(चौकट)
सर्वच विभागांची धावपळ
जनतेच्या प्रश्नांवर नेहमीच अलर्ट असणारे या विभागाचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्वच विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना ७२ तासांत तालुक्यातील जनजीवन सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सर्वच विभागांनी धडपड चालू केली आहे. मात्र, बांधकाम विभागाचे आभाळच एवढे फाटले आहे की टाका कुठे मारायचा? हेच बांधकाम विभागाला समजेना. यामुळे मंत्र्यांच्या आदेशानुसार ७२ तासांत दळणवळण सुरळीत करण्यासाठी बांधकाम विभागाची यंत्रणा आता रस्त्यावर उतरली आहे. मात्र, वरिष्ठांनी झाकलेल्या चुकीच्या कामाचा बुरखा निसर्गानेच फाडल्याने आता बांधकामच्या अधिकाऱ्यांची मात्र पळता भुई थोडी झाली आहे, हे निश्चित.
२९ ढेबेवाडी
पाटण तालुक्यात बांधकाम विभागाकडून तुटलेले रस्ते-पूल दुरुस्तीची कामे सुरू आहेत.