ढगाळ हवामानामुळे कांद्यावर ‘होपा’चा प्रादुर्भाव
By admin | Published: November 19, 2014 08:58 PM2014-11-19T20:58:49+5:302014-11-19T23:18:09+5:30
आर्थिक संकट : शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
पळशी : माण तालुक्यात पळशी येथे ज्वारी, मका, कडधान्ये या पिकांबरोबरच कांद्याचे पीक घेणारे असंख्य शेतकरी आहेत. उशिरा का होईना दमदार पाऊस झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी कमी काळात जास्त पैसा मिळवून देणाऱ्या कांदा पिकाची लागवड केली आहे. पंधरा दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर ‘होपा’चा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कांद्याची पाती चिकटून बसल्या आहेत. यामुळे कांद्याची वाढ मंदावत आहे. त्याचा फटका कांद्याच्या एकूण उत्पादनावर होत आहे. अर्धवट वाढलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोलाची किंमत मिळत आहे. त्यामुळे शेतकरी रोगास बळी पडलेल्या कांद्यावर औषध फवारणी करण्यात मग्न आहेत. औषधांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. ढगाळ वातावरणामुळे कांद्यावरील रोगाचे प्रमाण वाढतच असल्याने शेतकरी चिंतातूर आहे. त्यातच कांद्याचे दर दिवसेंदिवस घसरत असल्याने लागवड, खते, बियाणे, मशागत हा खर्चही निघेल का? अशी धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. (वार्ताहर)