दरड कोसळल्याने आंबेनळी घाटात वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:12 PM2018-09-26T23:12:24+5:302018-09-26T23:12:30+5:30
महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटातील दुधोशी फाट्याजवळ बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास महाकाय दरड कोसळली. यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर कोसळलेली दरड जेसीबीच्या साह्याने हटविण्याचे काम सुमारे तीन तासांनंतर सुरू केले.
याबाबत माहिती अशी की, आंबेनळी घाटरस्त्यावर दुधोशी फाट्याजवळ महाकाय दरड बुधवारी पहाटे सहाच्या दरम्यान पडली. यामुळे निम्म्याहून अधिक रस्ता अडविला गेला. साहजिकच वाहतूक ठप्प झाली होती. मुख्य घाटमार्गावर अवजड वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली.
ग्रामीण भागातून नेहमीचे प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल झाले. पावसाळ्यामध्ये आंबेनळी घाटरस्ता, तापोळा रस्ता व केळघर घाटरस्त्यावर नेहमीच दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असतात. आंबेनळी घाटरस्त्यावर कोसळलेली दरड हटविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने सुमारे तीन तासांनंतर सुरू केले. जेसीबीच्या मदतीने दगड, माती काढली जात होती.