पोलिसांच्या व्यूहरचनेमुळे सातारमध्ये टळला मोठा अनर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 07:59 PM2017-10-06T19:59:13+5:302017-10-06T19:59:13+5:30
पोलिस प्रशासनाने उदयनराजेंसह कार्यकर्त्यांच्या वाहनांची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीमुळे खासदारांबरोबरच्या गर्दीची विभागणी झाली. विश्रामगृहात दोन्ही गट परस्परांत भिडले असते तर मोठा अनर्थ झाला असता.
सातारा : शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार शिवेंद्रसिंहराजे शासकीय विश्रामगृहावर दाखल झाल्याची माहिती मिळताच खासदार उदयनराजे यांनी टोल नाक्यावर काही कार्यकर्त्यांना थांबवून आपला मोर्चा साताºयाच्या दिशेने वळविला. याविषयी माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने उदयनराजेंसह कार्यकर्त्यांच्या वाहनांची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीमुळे खासदरांबरोबरच्या गर्दीची विभागणी झाली. विश्रामगृहात दोन्ही गट परस्परांत भिडले असते तर मोठा अनर्थ झाला असता.
आमदार शिवेंद्रसिंहराजे गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास शेकडो कार्यकर्त्यांसह विश्रामगृहावर असल्याची माहिती खासदार उदयनराजे यांच्या कानी पडल्यानंतर त्यांचा पारा चढला.
ए चला रे सर्किट हाऊसला असे म्हणत गाड्यांचा लवाजमा त्यांच्या मागे गेला. याविषयीची माहिती तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने मुख्यालयात कळविली. त्यानंतर अन्य ठिकाणी असलेल्या पोलिसांना तातडीने वाढेफाटा येथे नाकाबंदी करण्याचे आदेश दिले.
त्यामुळे उदयनराजे यांच्या ताफ्यातील काही गाड्या सोडल्या; पण अन्य गाड्यांना अडवून त्यांची तपासणी करण्यात आली. तपासाच्या निमित्ताने गाड्या आडवल्यामुळे कार्यकर्ते आणि उदयनराजे यांच्या गाड्यांमधील अंतर वाढले.
उदयनराजे विश्रामगृहावर पोहोचेपर्यंत आमदार आपल्या निवासस्थानी पोहोचले होते. मागे राहिलेले कार्यकर्ते अद्याप न आल्याने मोजक्याच कार्यकर्त्यांसह आमदार निवासस्थानी भिडले.
पोलिसांनी वेळेतच खबरदारी घेऊन नाकाबंदी केली नसती तर दोन्ही राजे गटांचा जमाव पांगवणं पोलिसांना अशक्यप्राय झाले असते. त्यामुळे चाणाक्षपणे त्यांनी केलेल्या नाकाबंदीमुळे मोठा अनर्थ टळला.