कोरोनामुळे गावातील पार अन् कट्टे निःशब्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:49 AM2021-04-30T04:49:05+5:302021-04-30T04:49:05+5:30
कुडाळ : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या सगळीकडेच संचारबंदी आणि जमावबंदी लागू आहे. यामुळे विरंगुळा म्हणून एकमेकांशी होणाऱ्या पारावरच्या गप्पा, ...
कुडाळ : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या सगळीकडेच संचारबंदी आणि जमावबंदी लागू आहे. यामुळे विरंगुळा म्हणून एकमेकांशी होणाऱ्या पारावरच्या गप्पा, मनातील सहवेदना व्यक्त होणारे गावकट्टे सध्या तरी निःशब्द झाले आहेत. परस्परांमधील होणारा संवाद यामुळे पुरता थांबला आहे.
गावातील मंडळी एकत्र येऊन गावाच्या पारावर त्यांच्या गप्पांना रंगत यायची. अगदी लहान-थोरांपासून सारेजण या ठिकणी आपला फावला वेळ व्यतित करत असत. आज मात्र परिस्थिती काहीशी वेगळीच आहे. या ठिकाणी झाडाच्या सावलीत कोणीच दिसत नाही. विविध विषयांवर होणाऱ्या गप्पा, दिल्लीपासून गावाच्या गल्लीपर्यंतच्या रंगणाऱ्या चर्चा, सारं काही निःशब्द होऊन रुसलं आहे. गावातल्या युवकांच्या मैफिलीचा कट्टा सुद्धा कोरोनात सुन्न आहे. यामुळे आजी, आजोबा नातवंडांबरोबर आपला वेळ घालवत आहेत. ऑनलाईन अभ्यासात रमलेल्या मुलांना मात्र आता शाळा कधी सुरू होतील याचे वेध लागले आहेत. कॅरम, बुद्धिबळ, अशा खेळांत ही बच्चेकंपनी आपला रिकामा वेळ घालवताना दिसत आहे.
भरलेले गाव आणि गजबजलेली शहरे सारे काही सुन्न सुन्न आहे. सगळ्यांचाच पुरता चेहरामोहरा बदललेला आहे. ना कुणाचं दार ना घर, अशी काहीशी स्थिती आहे. कोरोनाने माणसातूनच माणूस उठवला आहे. गेले वर्ष झाले, कसलाही उत्सव, कार्यक्रम काहीही नाही. कोणाकडेही जाणे-येणे नाही. यामुळे प्रत्येकाला आता जगण्याची खरी किंमत कळायला लागली आहे. आपलेच सगेसोयरे कधी अचानक सोडून आपल्यातून निघून जात आहेत हेही समजेना.
चौकट..
आरोग्याच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा...
कोरोनामुळे आता गावातही शांतता पाहायला मिळत आहे. अशातच नेहमी हसण्या-खिदळण्याच्या, गप्पांच्या मैफिलीसाठी रंगणारा गावचा पारही नि:शब्द आहे. पुन्हा एकदा गावाच्या पारावरील गप्पा खुलण्यासाठी कोरोना कधी जाईल याचीच सर्वजण वाट पाहत आहेत. मात्र यासाठी सर्वांनीच आरोग्याच्या त्रिसूत्रीचा अवलंब करायला हवा.