कोरोनामुळे शिंगणापूर शंभू महादेवाची यात्रा दुसऱ्या वर्षीही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:40 AM2021-04-07T04:40:13+5:302021-04-07T04:40:13+5:30

पळशी : माण तालुक्यातील महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा १७ ते २७ एप्रिल ...

Due to corona, Yatra of Shingnapur Shambhu Mahadev was canceled for the second year | कोरोनामुळे शिंगणापूर शंभू महादेवाची यात्रा दुसऱ्या वर्षीही रद्द

कोरोनामुळे शिंगणापूर शंभू महादेवाची यात्रा दुसऱ्या वर्षीही रद्द

Next

पळशी : माण तालुक्यातील महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा १७ ते २७ एप्रिल अखेर होत असून, रविवार, ५ रोजी शिंगणापूर ग्रामपंचायत सभागृहात माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजन बैठक पार पडली. यावेळी यात्रा रद्द झाल्याचे सांगण्यात आले.

यात्रा कालावधीत शिंगणापूरमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून, भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीस माणच्या तहसीलदार बाई माने, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, आरोग्याधिकारी डाॅ. स्वाती बंदुके, देवस्थान व्यवस्थापक ओंकार देशपांडे, राजाराम बोराटे, हरिभाऊ बडवे आदी उपस्थित होते.

यात्रेसाठी मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकणसह राज्यभरातून सुमारे सात ते आठ लाख भाविक येत असतात; मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने यात्रेवर प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शिंगणापूर येथील वार्षिक यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी जाहीर केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा गर्दी टाळण्यासाठी कडक निर्णय राबविणार असल्याचे सांगण्यात आले.

यात्रेतील सर्व धार्मिक विधी स्थानिक सेवाधारींनी, तसेच मानकरी यांनी करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. यात्रा कालावधीत बाहेरून येणाऱ्या भाविकांना शिंगणापूरमध्ये येण्यास प्रतिबंध घालण्यात आला असून, यात्राकाळात शिंगणापूर गावामध्ये येणारे सर्व रस्ते बंद करण्याच्या सूचना ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनास बैठकीत देण्यात आल्या आहेत.

यात्रा कालावधीत शिंगणापूरमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून, भाविकांना रोखण्यासाठी शिंगणापूर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी सांगितले. यात्रा कालावधीत ग्रामपंचायत, देवस्थान समितीने खबरदारी घेण्याच्या सूचना प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी दिल्या असून, भाविकांसह व्यावसायिक, सेवाधारी, ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

सलग दुसऱ्या वर्षीही शिखर शिंगणापूर यात्रा रद्द झाल्याने भाविकांत नाराजी पसरली आहे.

Web Title: Due to corona, Yatra of Shingnapur Shambhu Mahadev was canceled for the second year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.