‘सातारा लोकमत’च्या दशकपूर्तीनिमित्त उद्या स्नेहमेळावा
By admin | Published: May 14, 2016 11:46 PM2016-05-14T23:46:54+5:302016-05-14T23:46:54+5:30
राधिका चौकात वाचकांची मांदियाळी : ‘राधिका सांस्कृतिक संकुल’मध्ये सायंकाळी ६ ते ९ सोहळा
सातारा : ‘जिल्ह्यातील समाजमनाचा आरसा’ असा लौकिक प्राप्त केलेल्या ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीच्या दहावा वर्धापनदिन सोमवार, दि. १६ रोजी थाटामाटात साजरा होत आहे. या निमित्ताने राधिका चौकातील राधिका सांस्कृतिक संकुल येथे सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत स्नेहमेळावा आयोजित केला असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधायक प्रयत्नाचा सन्मान करीत, विजिगीषू वृत्तीच्या प्रत्येक यशस्वी सातारकराच्या नावाचा उद््घोष करीत आणि प्रत्येक विघातक शक्तीवर कठोर प्रहार करीत ‘लोकमत’ची सातारा आवृत्ती अकाराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. जिल्ह्याची परिपूर्णतेकडे वाटचाल व्हावी, हा हेतू ठेवून ‘लोकमत’ने मावळत्या वर्षातही अनेक उपक्रम राबविले.
केवळ बातमी देऊन न थांबता बातमीमागची बातमी शोधण्याचा प्रयत्न करून अचूक विश्लेषण सातारकरांसमोर ठेवले. ही विश्लेषणे, भाकिते आणि ठोकताळे अचूक ठरल्याने ‘लोकमत’वरील वाचकांचे प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत झाला आहे.
‘ग्लोबल सातारकर’ची भेट
वर्धापनदिनानिमित्त यंदा ‘लोकमत’तर्फे ‘ग्लोबर सातारकर’ हा विशेषांक प्रकाशित होत आहे. सातारा जिल्ह्यातील शहरं अन् खेडोपाड्यात राहणाऱ्या शेकडो युवकांनी सातासमुद्रापार आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. त्यांची यशोगाथा या विशेषांकाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. त्यांचा हा प्रवास सर्वांनाच प्रेरणादायी असाच आहे.