स्फूरद, जस्ताचे प्रमाण कमी झाल्याने उत्पादकता घटली
By admin | Published: December 4, 2015 10:25 PM2015-12-04T22:25:18+5:302015-12-05T00:24:58+5:30
शेतीला शाप : सूक्ष्म मूलद्रव्ययुक्त खते वापरावी लागणार--जागतिक मृदा दिन
मेहरुन नाकाडे -- रत्नागिरी---शेतजमिनीमध्ये लोह, स्फूरद, जस्त आदी घटक असणे आवश्यक आहे. मात्र, जस्त व स्फूरद हे दोन्ही घटक कमी असल्याने जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता घटत आहे. मातीतील स्फूरद व जस्त आदी घटकांचे प्रमाण वाढविण्यासाठी सूक्ष्म मूलद्रव्ययुक्त खते वापरावी लागणार आहेत. त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांना त्यासाठी आर्थिक भुर्दंड पडणार आहे.
पिकांच्या वाढीसाठी १६ अन्नद्रव्ये आवश्यक असून, ही सर्व अन्नद्रव्ये हवा, पाणी आणि मातीमधून मिळतात. या अन्नद्रव्यांपैकी लोह, स्फूरद आणि जस्त आवश्यक आहेत. लोहाचे प्रमाण योग्य आहे. जस्त ७२.३९ टक्के व स्फूरद ७९ टक्के इतके कमी आहे. जस्त वाढवण्यासाठी हेक्टरी २५ किलो सूक्ष्म मूलद्रव्य वापरणे आवश्यक आहे, तर स्फूरदचे प्रमाण नत्र, स्फूरद व पालाशसारख्या मिश्र खताच्या वापरातून वाढेल. सेंद्रिय कर्ब ७१.७८ टक्के व पालाश ८४ टक्क्यांनी अधिक आहे.
पावसामुळे दरवर्षी एक हेक्टर जमिनीतील १० ते ११ टन माती वाहून जाते. एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे लागतात. कोकणातील मातीची झीज होत आहे, शिवाय मातीतील घटकदेखील कमी आहेत. पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी प्रामुख्याने सूक्ष्म मूलद्रव्याचे प्रमाण ५ पर मिलीयम इतके असणे आवश्यक आहे. परंतु हेच प्रमाण कमी असल्याने यामुळे मुळांची वाढ होत नाही. त्यामुळे पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. जस्ताचे प्रमाण कमी असल्याने पिकाला पक्वता येत नाही, याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होत आहे
शासनाकडून मृद आरोग्य तपासणी अभियानांतर्गत जमिनीच्या सर्वसाधारण तपासणीमध्ये सामू, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फूरद, पालाश तपासणी करण्यात आली. विशेष मृद नमुन्यांतर्गत सामू, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फूरद, पालाश, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशिअम, मुक्त ुचुना, जलधारणा, मातीची घनता, पोत तर सूक्ष्म मूलद्रव्ये मृद नमुन्यांतर्गत तांबे, जस्त, लोह, मंगल याचीही स्वतंत्र तपासणी करण्यात येत आहे.
शेतकरी परीक्षण अहवाल प्रयोगशाळेतून स्वतंत्ररित्या मिळवण्याचा प्रयत्न आजपर्यंत करीत होते. परंतु आता हे परीक्षण शासनाकडून विनामूल्य होत असल्याने शेतकरीवर्गाला आपल्या जमिनीचा पोत, सुपिकता, उत्पादनक्षमता याची माहिती मिळणार आहे. मातीतील घटकांचे प्रमाण कमी आढळल्यास त्याप्रमाणे कमी अधिक प्रमाणात खताचा डोस वाढवण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येणार आहे.
लोहाचे प्रमाण ४.५ पीपीएमपेक्षा कमी आल्यास फेरस सल्फेट २५ ते ३० किलो वापरावे. तांब्याचे प्रमाण ०.२ पीपीएमपेक्षा कमी असेल तर १० ते १२ किलो कॉपर सल्फेट, मंगलचे प्रमाण २.० पीपीएमपेक्षा कमी आल्यास मॅग्नेशियम सल्फेट १० ते २५ किलो वापरावे. जस्तचे प्रमाण ०.६ पीपीएमपेक्षा कमी आल्यास २५ ते ३० किलो झिंक सल्फेट वापरण्याचा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे. त्यानुसार कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
जिल्ह्यातील १५२५ गावांतील साडेचार लाख शेतकऱ्यांच्या मातीच्या तपासणीचे काम सुरू आहे. १० हेक्टरला एक गट नमुन्याप्रमाणे ७५ हजार नमुन्यांची तपासणी तीन वर्षात पूर्ण केली जाणार आहे.मृददिनाचे औचित्य साधून ३१ हजार ४७९ शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे.
तालुका तयार
आरोग्य
पत्रिका
संगमेश्वर ११, १३४
चिपळूण११२३
गुहागर१६८
रत्नागिरी१२५
लांजा६२२
दापोली१७,५००
मंडणगड १५९
खेड४६८
एकूण३१,४७९
लोह, स्फूरद, जस्त यांच्या प्रमाणावर पिकांची उत्पादकता अवलंबून असते. मात्र, जस्त व स्फूरदचे प्रमाण कमी असल्याने या घटकांचा योग्य प्रमाणात पुरवठा होण्यासाठी शेतकऱ्यांनी गांडुळ खत, शेणखताचा वापर करावा. जस्तवाढीसाठी झिंक सल्फेट व स्फूरद वाढीसाठी मिश्र किंवा सरळ खते वापरावीत. त्याचबरोबर पिकाच्या वाढीसाठी स्फुरदयुक्त खतांचा वापर करावा. वर्षानुवर्षे शेतात एकाच पिकाचे उत्पादन घेण्याऐवजी त्यामध्ये सातत्य ठेवावे. माती परीक्षण करून त्याप्रमाणे आवश्यक त्या सूक्ष्म मूलद्रव्ययुक्त खतांचा कमी अधिक वापर करावा.
- एस. सी. धाडवे, अधिकारी, रत्नागिरी जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी.