खचलेल्या घाटामुळे कास पठाराची फुलं अनिश्चित काळापर्यंत दुर्मिळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:28 AM2017-10-02T11:28:08+5:302017-10-02T11:39:46+5:30
कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटात रस्ता खचल्यामुळे अनिश्चित काळापर्यंत हा रस्ता बंद करण्यात आला आहे. केवळ पठारावर राहणाऱ्या स्थानिक दुचाकीस्वारांना वगळता कोणत्याही वाहनचालकाला यापुढे 'कास'कडे प्रवेश नाही. दरम्यान सुटीनिमित्त कास पठारावर रविवारी मुक्कामाला गेलेल्या पर्यटकांना एकीव -कुसुंबी-मेढामार्गे खाली सोडण्यात येत आहे.
सातारा : कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटात सोमवारी पहाटे रस्ता खचल्यामुळे अनिश्चित काळापर्यंत हा रस्ता बंद करण्यात आला आहे. केवळ पठारावर राहणाऱ्या स्थानिक दुचाकीस्वारांना वगळता कोणत्याही वाहनचालकाला यापुढे 'कास'कडे प्रवेश नाही. दरम्यान सुटीनिमित्त कास पठारावर रविवारी मुक्कामाला गेलेल्या पर्यटकांना एकीव -कुसुंबी-मेढामार्गे खाली सोडण्यात येत आहे.
शनिवार रविवारला जोडून गांधी जयंती दिनाची सुट्टी आल्यामुळे हजारो पर्यटक सध्या कास पठारावर आहेत. पुण्या-मुंबईकडूनही हजारो पर्यटक साताऱ्याहून 'कास'कडे निघाले होते. मात्र सोमवारी पहाटे कधीतरी अकस्मातपणे यवतेश्वर घाटातील रस्ता खचला. घटनेचे गांभीर्य ओळखून सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस खाते आणि वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी हजर झाले. खचलेला घाट अत्यंत अरुंद असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद करण्याचा निर्णय तत्काळ घेण्यात आला. तसेच खचलेल्या भागाजवळ डोंगराची भिंत जेसीबीने खणून काढून रस्ता अधिक रुंद करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
कासकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडय़ा सातारा शहरातील समर्थ मंदिर चौकातच अडविण्यात आल्या. सकाळपासून शेकडो गाड्या परत पाठविण्यात आल्या. मात्र, दूर दूरवरून आलेल्या पर्यटकांनी 'बोगदा'मार्गे ठोसेघर किंवा सज्जनगडकडे जाण्याचा निर्णय घेतला.
'लोकमत'नं दिला होता वेळोवेळी धोक्याचा इशारा !
यवतेश्वर घाटातील अनेक कठडे ढासळल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही क्षणी धोका होऊ शकतो, याची जाणीव 'लोकमत'मधून वेळोवेळी करून देण्यात आली होती. मात्र ढासळलेल्या कठड्यांच्या जागी केवळ पांढरा रंग लावलेले दगड लावून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला गेला. कासला 'हेरिटेज'चा दर्जा प्राप्त झाल्यापासून लाखो पर्यटकांची पावले इकडे वळाली आहेत. या पार्श्वभूमीवर हा रस्ता अधिकाधिक रुंद अन् चांगला करण्याची गरज आहे.