थकबाकीदारांचे पाणी बंद होणार, अनधिकृत नळजोड तोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:49 AM2019-12-14T11:49:34+5:302019-12-14T11:53:16+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील जनतेने थकबाकीच्या रकमा तत्काळ भराव्यात तसेच अनधिकृत नळजोड नियमित करुन घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. ग्राहकांना यासाठी १५ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे, त्यानंतर थकबाकीदार व अनधिकृत नळजोड तोडून पाणी बंद केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
सागर गुजर
सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील जनतेने थकबाकीच्या रकमा तत्काळ भराव्यात तसेच अनधिकृत नळजोड नियमित करुन घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. ग्राहकांना यासाठी १५ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे, त्यानंतर थकबाकीदार व अनधिकृत नळजोड तोडून पाणी बंद केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
प्राधिकरणाच्या माध्यमातून गोडोली (शाहूनगर), शाहूपुरी, सदरबझार व खिंडवाडी या चार भागांतील जनतेला लष्कर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. तब्बल १७ हजार अधिकृत नळजोड आहेत. तर प्राधिकरणच्या अंदाजानुसार २५00 अनधिकृत नळजोडांद्वारे पाणी चोरुन वापरले जाते.
पाणीपट्टीची बिले प्रत्येक दोन महिन्याला ग्राहकांना दिली जातात. पाणी पट्टी वसुलीची टक्केवारी तब्बल ७0 टक्के इतकी आहे. तरी देखील ३0 टक्के लोक पाणीपट्टी भरतच नसल्याचे समोर येत आहे. बिले थकवणाऱ्यांमुळे प्राधिकरणावर ताण येतो. आता ही थकबाकीची वसुली करण्यासाठी जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे.
प्राधिकरणतर्फे प्रत्येक भागात रिक्षा फिरवून नागरिकांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी ३२ ठिकाणी वसुली व समस्या निवारणाचे बुथ तयार केले आहेत. नागरिकांची या माध्यमातून सोय केली असल्याने त्यांनी वेळेत पाणीपट्टी भरणे अपेक्षित आहे.
दरम्यान, १५ जानेवारीपर्यंत थकबाकीदारांना गांधीगिरीमार्गाने समजावले जाईल. मात्र तरीही थकबाकी न भरण्याची मानसिकता दिसून आल्यास नळजोड तोडण्याची कारवाई सुरु करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
प्राधिकरण आपल्या दारीचा प्रयोग
जीवन प्राधिकरणच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून विविध भागांत रिक्षाद्वारे जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. पाणी गळतीच्या समस्येबाबतही नागरिकांनी तक्रार करावी. नळजोड नियमित करुन घ्यावेत तसेच पाणीपट्टी भरुन शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्राधिकरण आपल्या दारीच्या या प्रयोगामुळे जनजागृती होताना दिसते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून ज्या भागात पाणी पुरवठा केला जातो. त्या भागातील अनधिकृत नळजोड नियमित करुन घ्यावेत, थकबाकी भरावी, असे आवाहन नागरिकांना केले आहे. आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. आता लोकांनीच सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- संजय गायकवाड,
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण