अवकाळीमुळं ज्वारी भुईसपाट, सातारा जिल्ह्यात नुकसान : द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:51 AM2017-11-24T00:51:58+5:302017-11-24T00:57:25+5:30
सातारा / वाठार स्टेशन : विजांचा कडकडाट अन् वादळी वाºयासह बराच वेळ पडलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ज्वारीसह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
सातारा / वाठार स्टेशन : विजांचा कडकडाट अन् वादळी वाºयासह बराच वेळ पडलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ज्वारीसह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी ज्वारीचे उभे पिक भुईसपाट झाले.
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी भागात सोनके, करंजखोप, नांदवळ, पिंपोडे बुद्रुक, दहिगाव, देऊर, तडवळे (संमत) वाघोली या गावांत गेली दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा काहींना लाभ झाला असला तरी आगाप ज्वारीची पिके मात्र या वादळी पाऊसाने भुईसपाट केली आहेत.
अगोदर सोयाबीन, घेवडा पीक दराअभावी धोक्यात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, यातच हाता तोंडाला आलेली ज्वारी ही भुईसपाट झाल्याने ज्वारीचे पीक वाया गेले आहे. त्यामुळे डोक्याला हात लावून बसण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. शासनाने याबाबत नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांमधून जोर धरू लागली आहे
बागायतदार पावसाने अडचणीत
कलेढोण परिसरातील विखळे, पाचवड, गारळेवाडी व गारुडी भागामध्ये हजारो एकर द्राक्ष बागांचे क्षेत्र आहे. बुधवारी सायंकाळी या भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाच्या सरी पडल्या त्यामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षांचे मनी धरण्याची स्टेज आहे. तर काही बागांमध्ये मनी धरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशावेळी हा पाऊस झाल्यामुळे द्राक्ष पिकाबरोबरच द्राक्ष बागायतदार अडचणीत आले आहेत.
कलेढोण भागाला पावसाचा तडाखा
कलेढोण, ता. खटाव परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून, या पावसामुळे मनी धरण्याच्या स्थितीत असलेल्या द्राक्ष पिकाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. या पावसामुळे दावण्या व भुरीचा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे.
या अवकाळी पावसामुळे द्र्राक्षावर परिणाम होणार आहे. दावण्या व भुरीचा रोग होण्याचे वातावरण या अवकाळीने निर्माण झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले द्राक्ष पिक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
- कृष्णा शिंदे, द्राक्ष बागायतदार, कलेढोण
तडवळे (संमत)वाघोली गावात काल झालेल्या मुसळधार पावसाने ज्वारी पीक भुईसपाट झाले आहे. याबाबत शेतकºयांना नुकसान भरपाई मिळून कृषी विभागाने ज्वारीच्या पिकाचे पंचनामे करून शासनाला सादर करावेत.
- कमलाकर भोईटे, तडवळे