काँग्रेसमधील ‘ना’राजी नाट्य संपता संपेना.. घडतंय बिघडतंय : ‘माण-खटाव’च्या कार्यक्रमांना जिल्हाध्यक्षांची गैरहजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:08 AM2018-09-05T00:08:18+5:302018-09-05T00:11:43+5:30
‘पुन्हा काँग्रेसचेच सरकार पाहिजे !’ असा नारा देत निघालेली जनसंघर्ष यात्रा सगळीकडेच पोहोचत आहे. रविवार अन् सोमवारी ही यात्रा सातारा जिल्ह्यात आली अन् पुढे निघूनही गेली; पण मागे राहिले ते जिल्ह्यातील काँगे्रस अंतर्गत वादाचे ‘ना’राजी नाट्य ! कऱ्हाडच्या
प्रमोद सुकरे ।
कऱ्हाड : ‘पुन्हा काँग्रेसचेच सरकार पाहिजे !’ असा नारा देत निघालेली जनसंघर्ष यात्रा सगळीकडेच पोहोचत आहे. रविवार अन् सोमवारी ही यात्रा सातारा जिल्ह्यात आली अन् पुढे निघूनही गेली; पण मागे राहिले ते जिल्ह्यातील काँगे्रस अंतर्गत वादाचे ‘ना’राजी नाट्य ! कऱ्हाडच्या कार्यक्रमाला माण-खटावचे आमदार गोरे उपस्थित होते. मात्र, माण-खटावच्या कार्यक्रमांना जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत ‘ना’राजी नाट्य संपता संपेना, अशीच भावना सध्या सामान्य काँग्रेसजनांकडून व्यक्त होताना दिसतेय.
सातारा जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता; पण पुढे तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कधी झाला, हे लवकर कळालेच नाही; पण ‘ताटात काय अन् वाटीत काय’ असे म्हणून काहींनी स्वत:चेच समाधान करून घेतले. मग अधूनमधून काहींनी ‘धनुष्यबाणाने’ अचूक नेमही साधला. सातारची राजकीय भूमी भाजपसाठी खडकाळ मानली जात होती; पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाचा आलेख पाहता येथे ‘कमळ’ चांगलेच फुलू लागल्याचे दिसतेय. आता तर साखर सम्राटांच्या पट्ट्यातील या जमिनीत भाजपही उसाचे चांगले पीक घेण्यासाठी उत्सुक आहे. त्यासाठी शेतीची मशागतही सुरू दिसतेय. असो.....
या साऱ्या राजकीय परिस्थितीत काँग्रेससमोर जिल्ह्यात पुन्हा गतवैभव प्राप्त करण्याचे मोठे आव्हान आहे. ते पेलायचे असेल तर ‘एकीचे बळ’ दाखविल्याशिवाय ‘हाता’ला फळ लागणार नाही; पण त्याबाबत विचार करण्याऐवजी रुसारुशी अन् नाराजीचेच दर्शन वेळोवेळी होत आहे.
नुकत्याच झालेल्या जनसंघर्ष यात्रेतही त्याचेच प्रत्यंतर आले. कºहाडात रविवारी ही यात्रा मुक्कामी आली अन् जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी त्याचा ताबा घेतला. जिल्ह्यातील काँग्रेसचे दुसरे आमदार जयकुमार गोरे या ठिकाणी उपस्थित होते; पण त्यांचं सुरक्षित अंतर साºयांनाच जाणवत होतं.
सोमवारी सकाळी ही संघर्ष यात्रा दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून पुढे माण-खटावकडे रवाना झाली; पण या यात्रेचा बसरूपी रथ जिल्ह्याध्यक्षांविनाच पुढे सरकला. पृथ्वीबाबांनीही अशोकरावांना ‘तुम्ही पुढे चला मी मागून येतो,’ असे सांगितले; पण ही बाब गोरेंच्या लक्षात आली. ते गाडीतून खाली उतरून पृथ्वीबाबांजवळ गेले. ‘तुम्ही बरोबर चला,’ अशी विनंती केली. त्यावर बाबांनी ‘मी मागून येतो,’ असे त्यांनाही सांगितले; पण चाणाक्ष गोरे बाबांच्याच गाडीत बसले. ‘तुमचे काम झाल्यावर दोघे बरोबर जाऊ,’ असे म्हटले. तेव्हा कोठे पृथ्वीराजबाबांची गाडी माण- खटावच्या कार्यक्रमाला पोहोचली; पण तोवर जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत नाराजीची कुणकुण राज्यभरातील काँग्रेस नेत्यांच्या कानी पोहोचली होती.
आता या नाराजी ‘नाट्यावर’ पडदा कधी पडणार, हा खरा प्रश्न आहे. का ‘ए तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है,’ असे म्हणत नेते यापुढेही एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्याच काढत बसणार अन् त्यातून काँग्रेसच्या ‘हाता’ ला काय लागणार, हे पाहण्यासाठी थोडे थांबावेच लागेल.
जिल्हाध्यक्ष पदावरून वाद कायम
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निष्ठावंत पाईक म्हणून आनंदराव पाटील यांची ओळख आहे. त्यामुळेच सुमारे दहा वर्षांपासून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा तेच सांभाळत आहेत. या अगोदर कृष्णा खोरे विकास मंडळाचे उपाध्यक्षपद व नंतर ते विधान परिषदेवर आमदारही झाले आहेत. गत विधानसभा निवडणूक व त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर जिल्हाध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले अन् गोरे, पाटील या दोन आमदारांच्यात वादाची ठिणगी पडली, ती अजूनही विझलेली नाही.
यात्रेच्या मार्गावरही ‘ना’राजी
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतून सातारा जिल्ह्यात आलेली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा कºहाड, माण, खटाव तालुक्यांपुरतीच मर्यादित राहिली, अशी टीका होतेय. जिल्ह्याच्या ठिकाणी वा अन्य तालुक्यांत ती जाणीवपूर्वक पोहोचवली नाही, असे काहींचे मत आहे. संयोजकांच्या सोयीच्या मार्गावरही दस्तुरखुद्द काँग्रेसचेच अनेक कार्यकर्ते ‘ना’राजी व्यक्त करताना दिसतात.
‘कदमां’चेही ‘धैर्य’ वाढले....
कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना झाल्यावर राजकीय पक्षांनाही कार्यकर्त्यांची पुनर्बांधणी करावी लागली. नाव जरी ‘कºहाड उत्तर’ असले तरी यात चार तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. गतवेळी विद्यमान राष्ट्रवादी आमदारांच्या विरोधात ‘मनोधैर्य’ एकवटून दोघेजण रिंगणात उतरले होते. त्यातील काँग्रेसच्या चिन्हावर रहिमतपूरच्या एकाने ‘कदम’ पुढे टाकले होते. मुख्यमंत्री असताना पृथ्वीबाबांनी त्यांच्या ‘हाता’ला बळ दिले होते. उमेदवारी देऊन लढा म्हणून सांगितले; पण पृथ्वीबाबांनी उत्तरेत एकही सभा घेतली नाही. जिल्हाध्यक्षांनी लक्ष दिले नाही. याची सल आजही कदमांच्या मनात घर करून आहे. त्या रागापोटीच गोरेंच्या हाताला पकडून पाटलांच्या विरोधात बोलण्याचे ‘धैर्य’ ते करताना दिसतात.
जिल्हाध्यक्षांची छबी ‘ना-ना’.....
‘महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हक्कासाठी’ काँग्रेसने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेचे माण-खटावातही जोरदार स्वागत झाले. मात्र, स्वागतासाठी लावलेल्या फ्लेक्सवर व माध्यमांच्या जाहिरातीत जिल्हाध्यक्षांची छबी ‘ना-ना’ अशीच स्थिती पाहायला मिळाली. तत्पूर्वी कºहाडात संघर्ष यात्रेनिमित्त लावलेल्या जाहिरातीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांचे अनेक ‘चेहरे’ झळकत होते; पण त्यात आमदार ‘गोरे’ दिसत नव्हते.