दुष्काळ पुसणारं पाणी येणार म्हणून मोठं अप्रूप : टेंभू योजनेंतर्गत पाईपलाईनचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 10:20 PM2018-09-02T22:20:11+5:302018-09-02T22:20:46+5:30
दुष्काळात भरडणाऱ्या आणि पाण्यासाठी भटकंती करणाºया माण आणि खटाव तालुक्यांतील अनेक गावांची तहान आता सांगली जिल्ह्यातून येणाºया टेंभू योजनेच्या पाण्यातून भागणार आहे. सातारकरांचं हक्काचं पाणी सांगलीतून पुन्हा
नितीन काळेल।
सातारा : दुष्काळात भरडणाऱ्या आणि पाण्यासाठी भटकंती करणाºया माण आणि खटाव तालुक्यांतील अनेक गावांची तहान आता सांगली जिल्ह्यातून येणाºया टेंभू योजनेच्या पाण्यातून भागणार आहे. सातारकरांचं हक्काचं पाणी सांगलीतून पुन्हा जिल्ह्यालाच मिळणार आहे. या महत्त्वकांक्षी योजनेंतर्गत माणच्या दक्षिणेकडील १६ गावांना पाणी येणार आहे. त्याच्या पाईपलाईनचे काम सुरू झाले असून, लाभक्षेत्रातील लोक ते पाहण्यासाठी जाऊ लागले आहेत. तर येत्या सहा महिन्यांत काम पूर्ण होऊन ओढ्याला पाणी खळाळून तलाव भरणार आहे.
मूळत: टेंभू उपसा सिंचन योजना ही सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी आहे. या योजनेतून २१८ गावांतील क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामध्ये कºहाड तालुक्यात एक, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील ३२ गावे आणि सांगली जिल्ह्यातील १८५ च्या आसपास गावांना या योजनेचा फायदा होणार आहे. त्यासाठी २२ टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. कोयना, तारळी आणि वांग धरणातून हे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यात कोयनेतील सर्वाधिक १८ टीएमसी पाणी या टेंभू योजनेतून सिंचनासाठी दिले जाते. सद्य:स्थितीत ही योजना ५० ते ६० टक्क्यांपर्यंत सुरू झाली आहे. पण, ही योजना सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून जात असताना त्यातील पाणी माण आणि खटाव तालुक्यांतील गावांना मिळावे, अशी मागणी होती. त्याप्रमाणे अनेकांनी लढा सुरू केला होता. त्याला यश आले आहे.
सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून जाणाºया टेंभू कालव्याच्या माध्यमातून माण तालुक्यातील १६ गावांसाठी फायदा होणार आहे. या गावांसाठी ०.९२ दलघमी पाणी मिळणार आहे. हे पाणी रोटेशनप्रमाणे सोडण्यात येणार आहे. यामुळे अनेक गावांना लाभ मिळणार आहे. शिवाय हे पाणी महाबळेश्वरवाडी तलावात येणार आहे. या तलावाखाली चार गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी आहेत. त्यामुळे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघणार आहे. तसेच बंधाºयातही पाणीसाठा होण्याने विहिरींची पाणी पातळी वाढण्याने काही प्रमाणात शेती पाण्याचाही प्रश्न संपुष्टात येणार आहे. हे पाणी आटपाडी कालव्याच्या किलोमीटर १३ मधून माण तालुक्याला मिळणार आहे.
एकंदरीतच सातारा-सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरुन जाणाºया या टेंभू योजनेमुळे कायम दुष्काळी असणाºया माण तालुक्यातील अनेक गावांची तहान कायमस्वरुपी भागणार असून, पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ कायम संपलेला असणार आहे.
लवकरच होणार उद्घाटन...
टेंभू योजनेतून पिण्यासाठी पाणी देण्यात येणार आहे. ९.५० कोटी रुपये त्यासाठी मिळणार आहेत. पाणी सोडण्यासाठी कमी खर्च लागणार आहे. या योजनेचे काम लवकर होऊन काही महिन्यांतच पाणी मिळणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा शेवटचाच हा दुष्काळ असणार आहे. तर काही दिवसांतच मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. काम सुरू झाल्याने उत्साहाचे वातावरण आहे.
टेंभू सिंचन योजना सोलापूर आणि सांगली जिल्ह्णांसाठी आहे. आता योजनेमधून माण आणि खटाव तालुक्यांतील काही गावांना पिण्यासाठी पाणी देण्यात येत आहे. माण तालुक्यातील गावांसाठी असणाºया कालव्याच्या कामाचे लवकरच उद्घाटन होईल. चार महिन्यांत काम पूर्ण होऊन योजनेचे पाणी सोडण्यात येईल.
- हणमंत गुणाले, अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग