जलवाहिनी जोडण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 01:47 PM2019-03-21T13:47:09+5:302019-03-21T13:50:54+5:30
पारगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी अशोक पवार यांचा अजनुज जवळील कडजाई धरणामध्ये बुडून मृत्यू झाला. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला धरणातून पाईपलाईन जोडण्यासाठी ते गेले होते. यावेळी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अशोक दत्तू पवार (वय ३२) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
खंडाळा : पारगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी अशोक पवार यांचा अजनुज जवळील कडजाई धरणामध्ये बुडून मृत्यू झाला. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला धरणातून पाईपलाईन जोडण्यासाठी ते गेले होते. यावेळी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अशोक दत्तू पवार (वय ३२) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
त्यांच्याबरोबर असणाऱ्या इतर सहकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, धरणाच्या आत सायफन पद्धतीने ग्रामपंचायतीच्या विहिरीत पाणी सोडण्यासाठी अशोक पवार बुधवारी दुपारी साडेतीन वाजता धरणाजवळ गेले होते. त्यांच्यासोबत इतरही कर्मचारी होते.
पाण्यामध्ये पाईप सोडत असताना पवार यांचा तोल गेला व ते पाण्यात पडले. त्यानंतर ते बाहेर आलेच नाहीत. सोबतच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात उडी घेऊन शोधण्याचा प्रयत्न केला. पण ते हाती लागले नाहीत. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी माहिती मिळताच खंडाळा तालुका मदत व बचाव पथक, खंडाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने शोध कार्य राबविल्या त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेची नोंद खंडाळा पोलिस स्थानकामध्ये झाली असून या संदर्भात अधिक तपास खंडाळा पोलिस करत आहेत.
दुष्काळाच्या झळा
पारगावच्या पाणीपुरवठयाची विहीर अजनुज गावच्या हद्दीत आहे. या विहिरीला उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच पाणी कमी पडते. त्यामुळे दरवर्षी कडजाई धरणातून पाईपद्वारे पाणी विहिरीत सोडले जाते. याच कामासाठी कर्मचारी गेले असता एकाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात होती.