स्ट्रॉबेरीसह पालेभाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव, उत्पन्नावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:24 PM2018-12-14T13:24:04+5:302018-12-14T13:27:07+5:30
पसरणी : वाई तालुक्यातील बदलत्या हवामानामुळे स्ट्रॉबेरीसह भाजीपाला यावर पडणाऱ्या करपा, तांबेरा, पांढरी भुरीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. स्ट्रॉबेरीसह ...
पसरणी : वाई तालुक्यातील बदलत्या हवामानामुळे स्ट्रॉबेरीसह भाजीपाला यावर पडणाऱ्या करपा, तांबेरा, पांढरी भुरीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. स्ट्रॉबेरीसह भाजीपाला वाचविण्याचे आव्हानच रोगांनी दिल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
वाईच्या पश्चिम भागात गोळेवाडी, गोळेगावसह कोंडवली या गावांमधून स्ट्रॉबेरीसह भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जातो. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाल्याने रोगराईचा बिमोड हवा तसा झालेला नाही, त्यातच वारंवार बदल होत असल्याने हवामानामुळे सध्या या भागातील स्ट्रॉबेरीसह कारले, तोडका, कोबी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो या पिकांवर तांबेरा, पांढरी भुरी, करपा, दावण्या, स्पॉट या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झालेला आहे.
रोगांचा प्रादुर्भाव
शासनाकडून जास्तीत-जास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा व तसा कृषी विभागाने पाठपुरावा करून शासन दरबारी सादर करावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी विकास सेवा सोसायटी, बँकांकडून कर्ज घेऊन शेतांची डागडुजी करावी लागते. यावर्षी स्ट्रॉबेरीसह सर्वच भाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने भाजीपाला करण्यासाठी झालेला खर्च जरी निघाला तरी समाधान मानावे लागणार आहे.
कृषी विभागाने मार्गदर्शन करावे...
कृषी विभागाने या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना पीक संरक्षणाविषयी व रोगांच्या बिमोडासाठी औषधांची फवारणी कशी करावी, यासाठी मार्गदर्शन करून व होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.