दहशतीमुळे ‘सातच्या आत घरात’
By admin | Published: December 23, 2014 12:29 AM2014-12-23T00:29:20+5:302014-12-23T00:29:20+5:30
कोणेगाव परिसरातील चित्र : बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थ भयभीत
उंब्रज : कोणेगाव, ता. कऱ्हाड येथे शेतात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. यामुळे कोणेगावातील शेतकरी व ग्रामस्थ यांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले असून, लोक सातच्या आत घरात, पुन्हा दिवस उजेडल्यावर घराबाहेर पडू लागलेत. दरम्यान, कृष्णाकाठावर बिबट्याचा वावर दिसून आल्यामुळे कोयनाकाठाबरोबर कृष्णाकाठावर बिबट्याची दहशत निर्माण निर्माण झाली आहे.
कोणेगाव येथील गजानन ढाणे हे कांबीरवाडीकडून कोणेगावला निघाले होते. याठिकाणी रेल्वेगेट आहे. या गेटच्या बाजूच्या उसात त्यांना बिबट्या दिसला. ते दुचाकीवर असल्यामुळे त्यांनी लवकर गाव गाठले, तर माणिक भोपते हे शेतात गेले असता त्यांनाही उसाच्या शेतात बिबट्या आढळून आला. काही दिवसांपूर्वी बेलवाडी रस्त्यावरही आनंदराव जाधव यांना बिबट्या दिसला होता.
बिबट्याचा वावर शिवारात दिसून येत असल्यामुळे कोणेगावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी शेतात जाण्यासाठी कचरत आहेत. यामुळे वनविभागाने तातडीने या बाबींकडे लक्ष देऊन बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)