महोत्सवामुळे माणदेशच्या महिलांचा वाढला रुबाब : चेतना सिन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:47 AM2017-11-24T00:47:34+5:302017-11-24T00:50:19+5:30
सातारा : ‘माणच्या मातीत महिला भगिनी कष्टाने वस्तू बनवतात. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा व त्यांची कला चिरंतर टिकून राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत
सातारा : ‘माणच्या मातीत महिला भगिनी कष्टाने वस्तू बनवतात. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा व त्यांची कला चिरंतर टिकून राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. माणदेशी महोत्सवामुळे माणच्या महिलांचा रुबाब वाढला आहे, त्या मंत्री, कलाकार, अधिकाºयांशी आत्मविश्वासाने बोलतात,’ असे प्रतिपादन माणदेशी फांउडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी केले.
गुरुवार, दि. २३ ते सोमवार, दि. २७ नोव्हेंबर या कालावधीत येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित माणदेशी महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या डीआरडीए विभागाचे प्रकल्प संचालक नितीन थाडे, ज्योतिर्मय फांउडेशनच्या सुवर्णा पाटील उपस्थित होते. यावेळी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
घोंगडी बनविणे, जाती, कुंभारकाम अशी कष्टाची कामे माणदेशातल्या महिला करतात. त्यांच्या उत्पादनाला मोठी बाजारपेठ नव्हती. साहजिकच त्यांची पुढची पिढी या व्यवसायापासू दूर जाऊन मजुरी करण्यावर भर देऊ लागली, हे लक्षात आल्यावर आम्ही ही कला जपली पाहिजे, यासाठी सर्व महिलांना एकत्रित करून हा उद्योग करीत आहोत, असेही सिन्हा म्हणाल्या.
दरम्यान, यशस्वी देशी उद्योजिकांच्या यशोगाथा व त्यांचे वास्तव अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकण्याची अपूर्व संधी २५ नोव्हेंबर रोजी सांयकाळी चार वाजता माणदेशी उद्योजिका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने ऐकायला मिळणार आहे. सिनेअभिनेत्री निवेदिता सराफ या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील १७ माणदेशी उद्योजिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी २०० मुलींना मोफत सायकल वाटप केले जाणार आहे.
२६ नोव्हेंबर रोजी दुर्गेश नंदिनी प्रस्तुत ‘गजर महाराष्ट्राचा’ हा लोककला व लावणीचा कार्यक्रम होणार आहे. सातारा जिल्हा परिषद व माणदेशी फांउडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बचत गटाच्या महिला, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन, शिबिरे होणार आहेत.
अन् भारावली अमृता!
तवे, जाती विकणाºया महिलेचा मार्केटिंग स्कील पाहून अभिनेत्री अमृता सुभाष भलतीच भारावली होती. आमच्या कढईत आमटी बनवली तर आरोग्य सुधारते, शरीरातील लोहाचे घटक वाढतात, असे ही महिला सांगत होती. उपस्थित सर्वजण शांतपणे या माणदेशी वृद्ध महिला सांगत असलेली माहिती ऐकत होते.