गिरिशिखरावरील नंदनवनात धुक्याची दुलई..

By admin | Published: May 19, 2016 10:31 PM2016-05-19T22:31:05+5:302016-05-20T00:02:13+5:30

महाबळेश्वरचा उन्हाळी हंगाम : वातावरणातील बदलाने पर्यटक सुखावले; आठ दिवसांत एक लाख पर्यटकांची हजेरी

Due to the fog on the Girishikhara Paradise .. | गिरिशिखरावरील नंदनवनात धुक्याची दुलई..

गिरिशिखरावरील नंदनवनात धुक्याची दुलई..

Next

महाबळेश्वर : उष्णतेच्या तीव्र लाटेत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश होरपळून निघाला असताना थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचा पारा मात्र खालावला आहे. सायंकाळ होताच या ठिकाणी धुक्याची दुलई पसरत असून, हवेत गारवा निर्माण होत आहे. वातावरणातील या बदलाने पर्यटक सुखावले असून, पर्यटक अल्हाददायी वातावरणाचा मनमुराद आनंद लुटत आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल एक लाख पर्यटकांनी महाबळेश्वरला भेट दिली आहे.
महाबळेश्वर, पाचगणी ही पर्यटकांच्या आकर्षणाची मुख्य केंद्रे आहेत. दरवर्षी लाखो देशी, विदेशी पर्यटक याठिकाणी येऊन पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटतात. एप्रिल-मे असा सलग दोन महिने महाबळेश्वरचा मुख्य हंगाम असतो. या महिन्यात महाबळेश्वरला सर्वाधिक पर्यटक भेटी देतात. सध्या संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. महाबळेश्वरचा पाराही वाढला होता; मात्र गेल्या दोन दिवसांपासून पारा खालावला आहे. सायंकाळ होताच शहरासह परिसरात दाट धुके पसरत असून, हवेत गारवा वाढत आहे. ऐन उन्हाळ्यात झालेल्या वातावरणातील या बदलाचा आनंदही पर्यटक मनसोक्त लुटत आहेत.
वेण्णा लेक, क्षेत्र महाबळेश्वर, आॅर्थरसीट, केटस पॉइंट, लॉडविक पॉइंट, मुंबई पॉइंट पर्यटकांना आकर्षित करत असून, या पॉइंटवर पर्यटकांची दिवसभर गर्दी होत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये राज्यासह परराज्यातील सुमारे एक लाख पर्यटकांनी या ठिकाणी हजेरी लावली. (प्रतिनिधी)


बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल
पर्यटकांच्या सेवेसाठी महाबळेश्वरची बाजारपेठ सज्ज झाली असून, राजस्थानी, बंगाली, काश्मिरी, मणिपुरी अशा विविध वस्तूंना पर्यटकांमधून मोठी मागणी आहे. तसेच स्ट्रॉबेरीपासून तयार करण्यात आलेले पदार्थ तसेच चना, चिक्की, चपला व कपडे यांनाही मोठी मागणी आहे. या वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून बाजारपेठेत दररोज कोट्यवधींची उलाढाल होत आहे.
नौकाविहारासाठी गर्दी
वेण्णा लेक हा पर्यटकांच्या आकर्षणाचा व महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. महाबळेश्वरला येणारा प्रत्येक पर्यटक याठिकाणी नौकाविहार केल्याशिवाय परतीचा प्रवास करीत नाही. वेण्णा लेक येथे सकाळपासूनच पर्यटकांची नौकाविहारासाठी गर्दी होत असून, सायंकाळी तिकीट काढण्यासाठी पर्यटकांच्या रांगा लागत आहेत.

 

Web Title: Due to the fog on the Girishikhara Paradise ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.