दमदार पाऊस पडल्याने बळीराजाही सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:26 AM2021-07-11T04:26:01+5:302021-07-11T04:26:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगामातील कडधान्य पिकांच्या पेरणीनंतर आता वाईच्या पश्चिम भागात भातपिकाच्या लावणीला वेग आला आहे. दुबार पेरणीचे संकट टळल्याने बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पाऊस पडत असल्याने भाताच्या बियाण्याचे तरवे जोमात आहेत. त्यांची चांगली वाढ झाली आहे. पश्चिम भागातील जांभळी, जोर खोर, बोरगाव, चिखली, अभेपुरी परिसरात लावणीची लगबग सुरु झाली आहे. वाईचा पश्चिम भाग हा विविध जातीचे भात उत्पादन करणारा भाग आहे. बासमतीसारख्या भाताची लागवड येथे मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या वाईच्या पश्चिम भागात भात लागवडीसाठी पूरक वातावरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भाताच्या विविध प्रजातींमध्ये ३७० बासमती, चंडीगड बासमती, पुसा बासमती, दिल्ली राईस, वरंगळ, इंद्रायणी, इंडो अमेरिका, कोलन, काळी कुसळी यांचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांनी दिली.
पश्चिम भागासह वाई तालुक्यात तीन हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. सध्या पावसाने दमदार सुरुवात केली आहे. हे वातावरण भाताच्या पिकाला पूरक आहे. ग्रामीण भागात सध्या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतीची मशागत करण्यासाठी कसरत करावी लागते. यासाठी यंत्रावर अवलंबून राहावे लागत आहे.
उशिरा का होईना निसर्गराजा बरसल्याने या भागात सध्या कोकणी गाणी ऐकायला मिळत आहेत. अतिशय मोहक व सुंदर निसर्गरम्य परिसर ही या भागाची देण असल्याने काम करण्याचा हुरूप व्दिगुणित होतो. या भागातील शेतकरी वारंगुळा करत असल्याने रोजगाराची कमतरता भासत नाही. संपूर्ण परिसरातील शेतकरी भाताच्या लागवणीत मग्न आहेत.
चौकट
यंत्राच्या सहाय्याने केलेली भात लागण ही कमी वेळात होत असल्याने यंत्रानाही मागणी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बैल जोडीचा, खते, बियाण्यांचा दर गगनाला भिडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला हा मेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या वाईच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
१०वाई-अॅग्री,०१
वाई तालुक्याच्या पश्चिम भागात यंदा पाऊस चांगला पडल्याने भात लावणीला वेग आला आहे.