कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे शासनाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:01+5:302021-04-03T04:35:01+5:30
करंजे : कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, शासनाकडून जय्यत तयारी सुरु केली असून, पोलीस परेड ग्राउंडवरील कोविड रुग्णालय सुरू करण्यात ...
करंजे : कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, शासनाकडून जय्यत तयारी सुरु केली असून, पोलीस परेड ग्राउंडवरील कोविड रुग्णालय सुरू करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार कमी झाला होता. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन मागे घेत अनेक निर्बंध मागे घेतले होते, पण आता परत कोरोनाने डोके वर काढले आहे व पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना बधितांची संख्या वाढली आहे. अक्षरशः कोरोनाचा उद्रेक झाला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांना
बेड शिल्लक राहिले नाहीत. रुग्णाला बेडसाठी कोविड डिफेंडर्स ग्रुप, सामाजिक संस्था यांच्यामार्फत कुठे बेड, तर कुठे प्लाझ्मा मिळते का, शोधावे लागत आहे. कोविड योद्धा अक्षरशः या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्लाझ्मासाठी प्रयत्न करून प्लाझ्मा डोनर शोधून देत आहेत. साताऱ्यात शासकीय यंत्रणा, कोविड डिफेंडर्स ग्रुप, सामाजिक संस्था यांच्यामार्फत कोरोना विरुद्ध लढ्यासाठी मोहीम सुरू आहे. यातच बेडची कमतरता लक्षात घेता, शासन आता पूर्वी बंद ठेवलेली कोविड रुग्णालय सुरू करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून आता पोलीस परेड ग्राउंडवरील पोलीस दलातर्फे तयार करण्यात आलेले रुग्णालय आता पुन्हा सुरू करण्यात येत आहे. नागरिकांनी सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मास्क, सॅनिटायजर, सोशल डिस्टन्सिंग पाळून कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे व शक्य तितक्या लवकर कोविड लस घेऊन शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न गरजेचे बनले आहे.
०२करंजे
सातारा शहरातील पोलीस परेड ग्राउंडवरील कोविड रुग्णालय सुरू करण्यात येत आहे.